IPL चा बळी! वाहतूक कोंडीत रुग्णवाहिका अडकली आणि महिलेचा मृत्यू, 26 दिवसांच्या बाळासह तीन मुलं झाली पोरकी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात रविवारी सामना झाला. सामना संपल्यानंतर उप्पल भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. या वाहतूक कोंडीत एक रुग्णवाहिका तब्बल 90 मिनिटे अडकून पडली. यामुळे रुग्णवाहिकेतील 26 दिवसांच्या बाळाच्या मातेचा वेळेवर उपचार न मिळाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. बिष्णू असे मृत महिलेचे नाव असून, ती आणि तिचे पती सुरेश हे मूळचे नेपाळचे रहिवासी आहेत. ते रोजगारासाठी हैदराबादमधील घाटकेसर येथे राहत होते. त्यांना सहा आणि चार वर्षांची दोन मुले आणि अवघ्या 26 दिवसांचे एक बाळ आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपड्याच्या दुकानात काम करणाऱ्या बिष्णू यांना रविवारी संध्याकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना आधी खासगी रुग्णालयात आणि नंतर एम्स बीबीनगर येथे नेण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी हैदराबादच्या ‘निम्स’ (NIMS) रुग्णालयात हलवण्यास सांगितले. मात्र, उप्पल स्टेडियमजवळ आयपीएल सामन्यामुळे रस्ते पूर्णपणे जाम होते. रुग्णवाहिका चालक आणि नातेवाईकांनी वारंवार विनंती करूनही 90 मिनिटे गाडी जागेवरून हलली नाही. या विलंबामुळे रुग्णवाहिकेतील ऑक्सिजनचा साठा संपला आणि श्वास घेण्यास त्रास झाल्याने बिष्णू यांचा रुग्णवाहिकेतच मृत्यू झाला. Hyderabad Mail ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

डेव्हिड वॉर्नरला ऑस्ट्रेलियामध्ये अटक; क्रीडा विश्वात खळबळ, PSL दरम्यान नेमकं काय घडलं?

या हृदयद्रावक घटनेनंतर मृत महिलेच्या कुटुंबीयांनी आणि रुग्णवाहिका चालकाने पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेळेत प्रतिसाद दिला नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. जर पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून रस्ता मोकळा करून दिला असता, तर महिलेचे प्राण वाचले असते, अशा भावना व्यक्त होत आहेत. या घटनेमुळे तीन लहान मुलांच्या डोक्यावरचे आईचे छत्र कायमचे हरवले असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.