आईवडिलांच्या आठवणीने हैदराबादचा राशीद झाला भावुक

सनरायझर्स हैदराबादने मंगळवारी दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ रोखला. या विजयात फिरकी गोलंदाज राशीद खान याने सिंहाचा वाटा उचलला. अवघ्या 14 धावांच्या मोबदल्यात त्याने दिल्ली कॅपिटल्सचे 3 फलंदाज बाद केले आणि सामन्याला कलाटणी दिली. त्याचीच ‘सामनावीर’ म्हणून निवड करण्यात आली. याप्रसंगी लढतीतील कामगिरीचे श्रेय त्याने आपल्या आईवडिलांना दिले. त्यांच्याच आठवणीने राशीद खान भावुक झाला होता.

राशीद खान यावेळी म्हणाला, गेली दीड वर्ष माझ्यासाठी वेदनादायक ठरलीत. आधी वडिलांचे निधन झाले आणि या वर्षी जून महिन्यात आईला मी गमावले. यामधून सावरण्यासाठी काही अवधी लागला. आयपीएलमधील लढतीत सामनावीर ठरल्यानंतर माझी आई त्या दिवशी कामगिरीबाबत बोलत असे. ती या खेळाची मोठी फॅन होती, असेही राशीद खान यावेळी म्हणाला.

पराभव स्वीकारला

दिल्ली कॅपिटल्सचा प्रशिक्षक रिकी पाँटिंग व कर्णधार श्रेयस अय्यर यांनी सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत झालेला पराभव स्वीकारला. सनरायझर्स हैदराबादकडून आमच्यापेक्षा छान खेळ झाला, असे रिकी पाँटिंग यावेळी म्हणाला. तसेच येथील वातावरणात मोठा बदल झालेला नव्हता. फक्त सीमारेषा दूर होती. पण सनरायझर्स हैदराबादच्या अव्वल तीन फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. एकेरी-दुहेरी धावांवर जोर दिला. अखेर याच धावांचा फरक जय-पराजयदरम्यान प्रकर्षाने जाणवला, असेही त्याने पुढे स्पष्ट केले.

कर्णधार श्रेयस अय्यरला 12 लाखांचा दंड

सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या लढतीत षटकांच्या गतीचा वेग मंद असल्याचा फटका दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला बसला. त्यामुळे त्याला 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. याआधी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीलाही षटकांची गती न राखल्यामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

आपली प्रतिक्रिया द्या