
आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस तुटवडय़ामुळे काचेच्या बाटल्या तयार करण्यात मोठय़ा अडचणी निर्माण झाल्या असून मद्यनिर्मितीवर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीत केवळ पंधरा दिवस पुरेल इतकाच साठा शिल्लक असल्याने दारू पुरवठय़ावर परिणाम होऊन आता दारूही मिळणार नाही की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे.
बीअर, सलाईन आणि विविध क्षेत्रांत वापरल्या जाणाऱ्या काचेच्या बाटल्या तयार करणाऱ्या ‘पॅनपॅक’ कंपनीला एलपीजी पुरेशा प्रमाणात मिळाला नाही तर काचेच्या बाटली उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. काचेच्या बाटल्या तयार करण्यासाठी या कंपनीला दररोज 12 मेट्रिक टन एलपीजी गॅसची आवश्यकता असते. बाटल्या बनवताना तापमान 1700 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवावे लागते. हे तापमान कमी करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी लागतो. मात्र गॅसचा तुटवडा निर्माण झाल्यास तापमान वाढ करण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागू शकतो. या गॅस तुटवडय़ामुळे बाटल्यांच्या उत्पादनावर परिणाम होण्याची भीती असून या ठिकाणी काम करणाऱ्या हजारो कामगारांवरही बेकारीची कुऱ्हाड कोसळू शकते.
बीअरचेही वांदे!
काचेच्या बाटल्यांसह अॅल्युमिनीअमच्या तुटवडय़ामुळे बीअर पॅकिंग होणाऱ्या पॅनचाही तुटवडा निर्माण होणार आहे. त्यामुळे कडक उन्हाळ्यात मोठय़ा प्रमाणात प्यायली जाणारी बीअर मिळणेही मुश्कील होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय काचेच्या बाटल्या तयार करण्यात अडचणी आल्यास मद्य भरण्यात अडचणी निर्माण होऊन मद्य पुरवठय़ावर याचा परिणाम होईल.





























































