Iran Israel News – इराण इस्रायल तणाव, हिंदुस्थानकडून 444 उड्डाणं रद्द होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराण–इस्त्रायल तणावामुळे मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्रात निर्माण झालेल्या अस्थिरतेचा परिणाम हिंदुस्थानातील विमानसेवेवरही दिसू लागला असून शेकडो उड्डाणे रद्द करण्याची वेळ आली आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने (MoCA) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सुमारे 444 उड्डाणे रद्द होण्याची शक्यता आहे. त्याआधी शनिवारीही 410 उड्डाणे हवाई क्षेत्रावरील निर्बंधांमुळे स्थगित करण्यात आली होती.

मंत्रालयाने सोशल मीडियावर दिलेल्या माहितीत सांगितले की, Directorate General of Civil Aviation (DGCA) विमान कंपन्यांशी सातत्याने समन्वय साधत असून प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व कार्यपद्धती नियमांनुसार पार पाडल्या जात आहेत.

प्रवाशांना सूचना

परिस्थिती सतत बदलत असल्याने प्रवाशांनी विमानतळावर जाण्यापूर्वी संबंधित विमान कंपनीकडून आपल्या उड्डाणाची अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन मंत्रालयाने केले आहे.

देशातील प्रमुख विमानतळांना संभाव्य मार्गबदल (डायव्हर्जन) आणि प्रवाशांच्या सुविधांसाठी सज्ज ठेवण्यात आले आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष नियुक्ती करून विमान कंपन्यांमधील समन्वय, टर्मिनलमधील गर्दी व्यवस्थापन आणि प्रवासी सुविधा यावर देखरेख ठेवली जात आहे.

मंत्रालयाच्या ‘Passenger Assistance Control Room’मार्फत प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींचे परीक्षण सुरू आहे. MoCAच्या माहितीनुसार, AirSewa या प्लॅटफॉर्मवर शुक्रवारी 216 तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी 105 तक्रारींवर तत्काळ तोडगा काढण्यात आला.

एअर इंडियाची अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द

दरम्यान, Air India ने 1 मार्च 2026 रोजी नियोजित असलेली अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द केल्याची घोषणा केली आहे. मध्य पूर्वेतील हवाई क्षेत्र बंद किंवा निर्बंधित असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’वरील पोस्टमध्ये एअर इंडियाने सांगितले की, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेतला जात असून जोखीम मूल्यांकनाच्या आधारे पुढील निर्णय जाहीर केले जातील. प्रवासी आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आला असून, झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली आहे. प्रभावित प्रवाशांना पर्यायी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही एअर इंडियाने नमूद केले.

एअर इंडियाने रविवारी सांगितले की, मध्य पूर्वेतील बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने नियोजित उड्डाणांमध्ये आवश्यक कपात करण्यात आली आहे.

सध्या परिस्थितीवर नागरी विमान वाहतूक मंत्रालय आणि संबंधित यंत्रणा बारकाईने लक्ष ठेवून असून प्रवाशांनी अधिकृत सूचनांवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.