इराणच्या राष्ट्राध्यक्षांचे हेलिकॉप्टर कोसळले, इब्राहिम रायसी बेपत्ता; खराब हवामानामुळे दुर्गम जंगल भागात बचावकार्याला अडथळे

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना एका धरणाच्या उद्घाटनासाठी पूर्व अझरबैजान प्रांताकडे घेऊन जाणारे हेलिकॉप्टर रविवारी खराब हवामानामुळे दुर्गम जंगल भागात कोसळल्याचे वृत्त आहे. इराणच्या सरकारी टीव्ही वाहिनीने हे वृत्त देताना, देशभरात रायसी यांच्यासाठी होणाऱया प्रार्थना आणि दाट धुक्यातील पर्वतीय भागात दडलेल्या अपघातस्थळाकडे पायी जात असलेल्या बचाव पथकांचे थेट कव्हरेज दाखवण्यासाठी सर्व नियमित कार्यक्रमांचे प्रसारण थांबवले आहे.

63 वर्षांचे कट्टरपंथीय रायसी हे इराणचे सर्वेसर्वा खोमेनी यांचे उत्तराधिकारी मानले जातात. 2021 मध्ये ते निवडून आले आहेत. अझरबैजानच्या सीमेवर आरास नदीवर बांधलेल्या धरणाचे उद्घाटन करून रायसी आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदोल्लाहियान परतत असताना पाऊसवाऱयामुळे धुक्यात दडलेला डोंगराळ भाग ओलांडत असताना हा अपघात झाल्याचे, इराणच्या अधिकाऱयाने रॉयटर्सला सांगितले.

आमचे बचाव पथक घटनास्थळी निघाले आहे. आम्ही अजूनही आशावादी आहोत परंतु व्रॅश साईटवरून येणारी माहिती अतिशय चिंताजनक आहे, असे या अधिकाऱयाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

रायसी यांनी पदभार स्वीकारल्यापासून नैतिकतेचे कायदे कडक करण्याचे आदेश दिले आहेत, सरकारविरोधी निषेधांवर रक्तरंजित कारवाईचे आदेश दिले आहेत केले आहे आणि जागतिक शक्तींशी आण्विक चर्चेत कठोर धोरण अवलंबले आहे.

रायसी यांच्यासोबत इराणचे परराष्ट्र मंत्री होसेन अमीराब्दोल्लाहियान, इराणच्या पूर्व अझरबैजान प्रांताचे गव्हर्नर आणि इतर अधिकारी आणि अंगरक्षक होते, अशी माहिती सरकारी इरना न्यूज एजन्सीने दिली.

धुके, वेगवान वारे, पाऊस यामुळे या पर्वतीय क्षेत्रांत बचाव हेलिकॉप्टर पोहचणे अवघड असल्याचे अधिकाऱयांनी सांगितले. आरस नदीवरील धरणाच्या उद्घाटनासाठी अझरबैजानचे राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासमवेत रायसी रविवारी पहाटे अझरबैजानच्या सीमेवर आले होते.