इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टरला अपघात; इब्राहिम रायसी यांच्याशी संपर्क तुटला

इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी यांना घेऊन जाणाऱ्या हेलिकॉप्टरला रविवारी अपघात झाला. हा अपघात पूर्व अझरबैजानमध्ये झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या ताफ्यात तीन हेलिकॉप्टर होते. त्यापैकी दोन हेलिकॉप्टरमध्ये मंत्री आणि इतर अधिकारी होते. ते हेलिकॉप्टर सुरक्षितपणे योग्य स्थानी पोहोचले. दरम्यान राष्ट्रपतींसोबत हेलिकॉप्टरमध्ये सय्यद मोहम्मद-अली अल-हाशेम, जुमा आणि तबरीझचे जमात आणि परराष्ट्र मंत्री होसेन अमीराबदुल्लाहियन देखील होते.

इराणी मीडियाच्या मते, राजधानी तेहरानच्या वायव्येस सुमारे 600 किलोमीटर अंतरावर अझरबैजानच्या सीमेवर असलेल्या जोल्फा शहराजवळ हा अपघात झाला. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी रविवारी अझरबैजानमधील धरणाचे उद्घाटन करण्यासाठी राष्ट्राध्यक्ष इल्हाम अलीयेव यांच्यासोबत होते. तेथून परतत असताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. इराणच्या न्यूज एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, इब्राहिम रायसी यांच्या ताफ्याशी संपर्क तुटला आहे. ड्रोनचा वापर करून ताफ्याचा शोध घेतला जात आहे.

दरम्याम अपघात झाल्याची माहिती मिळताच बचाव कार्याचे पथक अपघातस्थळी पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र खराब हवामानामुळे बचाव पथकांना तेथे पोहोचता आले नाही. रिपोर्टनुसार, इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी ज्या भागात होते त्या भागात मुसळधार पाऊसाचा इशारा देण्यात आला होता. यामुळे राष्ट्रपतींच्या विमानाचे हार्ड लँडिंग झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.