
घरगुती आणि व्यावसायिक गॅसच्या महागाईनंतर देशात आता पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीचा भडका उडणार आहे. देशातील प्रमुख खासगी तेल कंपनी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात लिटरमागे 5 रुपयांची, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
इराण युद्ध सुरू झाल्यापासून गेल्या 25 दिवसांत जागतिक बाजारातील कच्च्या तेलाचे दर 50 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे हिंदुस्थानी तेल कंपन्यांवरील आर्थिक भार वाढला आहे. ते कारण देत नायरा एनर्जीने आज दरवाढ जाहीर केली. त्यात राज्यांच्या व्हॅटची भर पडणार असल्याने ग्राहकांना पेट्रोल-डिझेलसाठी जास्त पैसे मोजावे लागतील. नायराचे देशात 6,967 कंप आहेत. येथील पेट्रोलचा भाव 100.71 रुपये लिटर, डिझेलचा भाव 91.31 रुपये लिटर असेल.
g हिंदुस्थानात सरकारी तेल कंपन्यांना तोटा झाल्यास सरकारकडून त्यांची भरपाई केली जाते. मात्र, खासगी कंपन्यांना अशी कोणतीही भरपाई मिळत नाही. अशा परिस्थितीत किमती वाढवण्याशिवाय आमच्याकडे पर्याय नव्हता, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले.
सरकारी कंपन्यांच्या निर्णयाकडे लक्ष
‘नायरा’ने दरवाढ केली असली तरी देशात 90 टक्के इंधनाचा पुरवठा करणाऱ्या सरकारी कंपन्यांचे पेट्रोल, डिझेलचे दर ‘जैसे थे’ आहेत. मात्र, कच्च्या तेलाचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यांचा तोटाही वाढत आहे. या कंपन्या हा तोटा सहन करणार की ग्राहकांच्या माथी मारणार याकडे आता लक्ष लागले आहे.





























































