
इराण युद्धाच्या झळा हिंदुस्थानातील स्वयंपाकघरांना बसल्या आहेत. जागतिक परिस्थितीकडे बोट दाखवत सरकारी तेल कंपन्यांनी भाववाढीचा बॉम्ब टाकला आहे. घरगुती गॅसचे दर थेट 60 रुपयांनी, तर व्यावसायिक सिलिंडरचे दर 115 रुपयांनी वाढले आहेत. नवे दर 7 मार्चपासून लागू झाले आहेत.
इराण-अमेरिका युद्धाचा तेलसमृद्ध आखाती देशांना मोठा फटका बसला आहे. इराणच्या हल्ल्यामुळे आखाती देशांतील अनेक रिफायनरी तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. तसेच होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल वाहतूक बंद आहे. त्याचा परिणाम पुरवठय़ावर व कच्च्या तेलाच्या किमतींवर झाला आहे. या पार्श्वभूमीवर तेल कंपन्यांनी दरवाढीचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा दर आता 1883 वर गेल्याने तयार जेवणाचे दरही वाढणार आहेत.
मार्च महिना चटके देणारा
मागील काही वर्षांतील आकडेवारी पाहता एलपीजी ग्राहकांसाठी मार्च महिना हे नेहमी महागाईचे चटके देणारा ठरला आहे. विशेषतः व्यावसायिक सिलिंडर प्रत्येक मार्च महिन्यात महाग झाला आहे. घरगुती सिलिंडरचे भावही अनेकदा वाढले आहेत.
- या निर्णयानंतर, मुंबईत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरचा भाव 1835 वर गेला आहे. दिल्लीत 1883, कोलकात्यात 1990, तर चेन्नईत 2043.50 रुपये झाला आहे.
- घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढल्यामुळे जनतेमध्ये रोष आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारी तेल कंपन्यांनी शेजारच्या देशांकडे बोट दाखवले आहे. इतर देशांशी तुलना करता आपल्याकडे घरगुती गॅस स्वस्तच आहे, असे तेल कंपन्यांचे म्हणणे आहे.
11 महिन्यांत दुसऱ्यांदा वाढ
सिलिंडरच्या दरात एका वर्षाच्या आत दुसऱयांदा वाढ झाली आहे. मागील वर्षी एप्रिलमध्ये गॅसचे दर 50 रुपयांनी वाढले होते, तर व्यावसायिक सिलिंडरचा दर वर्षभरात 302.50 रुपयांनी वाढला.
‘उज्ज्वला’ योजनेच्या लाभार्थ्यांनाही धक्का
‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या दहा कोटींहून लाभार्थ्यांनाही दरवाढीचा धक्का बसला आहे. त्यांना आता 14.2 किलोच्या सिलिंडरसाठी 613 रुपये मोजावे लागतील. या योजनेतील लाभार्थ्यांना वर्षाला 12 सिलिंडरवर 300 रुपयांचे अनुदान मिळत राहील, मात्र अनुदान वजा करून भराव्या लागणाऱ्या रकमेत 60 रुपयांची भर पडली आहे.
कोणत्या शहरात किती दर?
- मुंबई 912.50
- दिल्ली 913
- कोलकाता 939
- चेन्नई 928.50
























































