युद्धामुळे अर्थव्यवस्था मंदावली, महागाई आणखी भडकणार; केंद्राचा धक्कादायक अहवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिका आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंदावला आहे. युद्धाचा भडका आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमतींमुळे देशातील उत्पादन खर्च वाढला आहे. त्यामुळे आर्थिक उलाढालीवर विपरीत परिणाम झाल्याचे केंद्र सरकारने मान्य केले आहे. देशांतर्गत उत्पादनावरील खर्च वाढल्यामुळे येत्या काही काळात महागाई आणखी भडकण्याची भीती आहे.

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मार्च 2026चा मासिक आर्थिक आढावा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार, देशाच्या अर्थव्यवस्थेची गती कमी झाली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे, पश्चिम आशियातील युद्ध आणि वाढलेला तणाव हे प्रमुख कारण आहे. यामुळे कच्च्या तेलाचे दर वाढले आहेत. यामुळे देशांतर्गत उत्पादनाचा खर्च वाढला आहे. फेब्रुवारी महिन्यात युद्ध सुरू होईपर्यंत अर्थव्यवस्था भक्कम स्थितीत होती. मात्र, मार्च महिन्यात वेग मंदावला, असे अहवालात म्हटले आहे. देशात मागणी वाढलेली आहे मात्र, ग्रामीण भागात खरेदी घटल्याचे अहवालात म्हटले आहे. देशांतर्गत उत्पादनाचा खर्च वाढल्यामुळे घाऊक महागाई वाढण्याची शक्यता आहे. कच्च्या तेलाच्या किमती वाढलेल्या असल्यास देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. गेल्या दोन महिन्यांपासून किरकोळ आणि घाऊक महागाईत वाढ झालेली आहे. त्यात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

पुरवठा साखळी विस्कळीत

अहवालानुसार, जागतिक परिस्थिती बदलल्यानंतर ऊर्जा आणि मालवाहनाच्या क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. याचा थेट परिणाम उत्पादनावर झाला आहे. ई-वे बिलांची संख्या घटली आहे. जागतिक पुरवठा साखळीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे इंधन आणि कच्च्या मालाचा पुरवठा उशिरा होत आहे.