
हिंदुस्थानी वंशाचे आयर्लंडचे पंतप्रधान डॉ. लिओ वराडकर यांचे आपल्या मूळ गावी मालवण तालुक्यातील वराडमध्ये आगमन झाले. गावकऱ्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. यावेळी गावकऱ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले की, ‘हिंदुस्थानात मी पाच वेळा आलो मात्र माझे आजोबा, वडील राहत असलेल्या वराड गावी येण्याचा योग पहिल्यांदाच आला असून गावात येऊन मला अतिशय आनंद झाला आहे. माझे आडनाव या गावाशी जोडले आहे, याचाही आनंद असून आम्ही वराडकर कुटुंबीय गावच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू.’ असे ते म्हणाले आहेत.
शासकीय पातळीवर दौऱ्याचे आयोजन न करता घरगुती स्तरावर पंतप्रधान लिओ वराडकर यांचा खाजगी दौरा होता. कोणत्याही शासकीय यंत्रणेला दौऱ्याची कल्पना नव्हती असे चित्र होते. रविवारी सकाळी सिंधुदुर्गातील मालवण वराड या गावी ‘वरदश्री’ या निवासस्थानी लिओ वराडकर व कुटुंबियांचे जल्लोशी स्वागत करण्यात आले. पंतप्रधान वराडकर यांनी गाडीतून उतरताच हिंदुस्थानी पद्धतीने उपस्थितांना नमस्कार केला. यावेळी गावकऱ्यांनीही मालवणी बोली भाषेत जयघोष करत स्वागत केले. सुहासिनींनी पंचारती ओवळल्या. अगदी लहान थोर माणसांनी वराडकर यांना गराडा घातला.
डॉ. लिओ यांच्या सोबत त्यांचे वडील डॉ. अशोक वराडकर, आई मेरिअम, बहीण सोफिया, सोनिया, एरीक, जॉन, त्यांची मुले व संपूर्ण कुटुंबीय उपस्थित आहे. डॉ. लिओ वराडकर यांनी येथील मालवणी जेवणाचाही आस्वाद घेतला. त्यांनंतर गावात आंबा काजू बागेत फेरफटका मारला. गावातील शाळेत विध्यार्थ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. तर गावातील वेताळ मंदिर व कट्टा येथील चर्चलाही त्यांनी भेट दिली. वराड येथे आपल्या निवासस्थानी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी त्यांची चुलत बहीण शुभदा वराडकर यांनी दुभाषिकांची भूमिका बजावली.
आयर्लंड देशात मंत्री ते पंतप्रधान असा राजकीय प्रवास करणारे लिओ वराडकर यांचे वडील मूळ वराड गावचे मात्र डॉक्टर म्हणून इंग्लंड मध्ये सेवा बजावतांना मेरियम यांच्याशी विवाह झाला. त्यांनंतर ते आयर्लंडमध्ये स्थायिक झाले. लिओ यांचा जन्म तेथेच झाला. तेही डॉक्टर झाले. आरोग्य मंत्री झाले अन पंतप्रधानही. मात्र त्यांना आपल्या गावात यायची ओढ कायम होती असे त्यांनी सांगितले.

























































