चीन युद्धाच्या तयारीत आहे का?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

>> कर्नल अभय बा. पटवर्धन

लडाखजवळच्या क्षेत्रात चीनच्या ‘एअरबोर्न’ सैनिकांनी नुकताच युद्धाभ्यास केला. आपल्याकडील माध्यमांनी त्याची दखल घेतली नाही, मात्र देशाच्या संरक्षणाच्या दृष्टीने तो अत्यंत संवेदनशील असल्याने दुर्लक्ष करण्यासारखा नाही. असे युद्धाभ्यास युद्ध झाल्यास सामरिक बाजी मारण्यासाठी सर्वच देशांकडून प्रयत्न केले जात असतात. तथापि चीनचा पूर्वानुभव आणि त्या देशाचे विस्तारवादी धोरण यामुळे चीनने केलेला ताजा युद्धाभ्यास प्रश्न उपस्थित करणारा आहे. त्यातच तेथे अलीकडे झालेल्या राजकीय घडामोडी आणि ‘फाइट अॅण्ड विन द वॉर्स ऑन इटस् बॉर्डर्स’ हे त्या देशाचे बनलेले नवे ‘लष्करी ब्रीद’ यामुळे चीन युद्धाच्या तयारीत आहे का ही शंका बळकट करणारा आहे.

लडाखला लागून असलेल्या तिबेटच्या क्षेत्रात चीनच्या जवळपास १० हजार हवाई सैनिकांनी (एअरबोर्न) विमान आणि हेलिकॉप्टर्सद्वारे शत्रूकडे मागून हवाई हल्ला करण्याचा तीनदिवसीय युद्धाभ्यास केला. १९ जुलै २०१८ रोजी ‘न्यूयॉर्क टाइम्स’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये तसेच चिनी वृत्तपत्रांमध्ये या युद्धसरावाला पुष्टी देणाऱया बातम्या प्रसिद्ध झाल्या. हिंदुस्थानी प्रसारमाध्यमांनी मात्र या बातम्यांना महत्त्व दिले नाही. कदाचित संसदेतील अविश्वास ठरावाला ‘टीआरपी’ अधिक असल्यामुळे संरक्षणक्षमता आणि सीमा सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणाऱया या घडामोडींकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे.

अमेरिकेतील वृत्तपत्रांच्या बातमीत शत्रू कोण याचा निर्देश नसला तरी चीनचे आजन्म अध्यक्ष झाल्यानंतर नवनिर्वाचित राष्ट्रपती शी जिनपिंग यांची विधाने आणि पीपल्स लिबरेशन आर्मीच्या प्रमुखांनी चालू वर्षी जानेवारी महिन्यामध्ये डोकलामबद्दल वर्तवलेल्या भविष्यामुळे तिबेटच्या लडाखसमोरील क्षेत्रात झालेल्या या युद्धाभ्यासातील ‘शत्रू’ कोण याची सहज कल्पना येते. चिनी वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’नुसार चालू वर्षी मार्च महिन्यात पीएलएचे (चिनी लष्कर) कॉम्बॅट रेडी ट्रुप्स आणि पीपल्स आर्म्ड पोलिसांनी याच भागात संयुक्त कवायत केली होती. याखेरीज चिनी लष्कर या वर्षी रशियातील इंटरनॅशनल आर्मी गेम्स २०१८ मध्ये सहभागी होणार आहे. युद्धसदृश परिस्थितीमध्ये सामरिक प्रशिक्षणस्तर, सामरिक तैनातीची संकल्पना आणि सामरिक क्षमतेची चांचणी घेण्यासाठी हे एक उत्कृष्ट व्यासपीठ आहे.

पर्वतीय युद्धाच्या माध्यमाद्वारे हिंदुस्थानशी संलग्न असलेल्या हिमालयन सीमेच्या सुरक्षेची जबाबदारी चीन लष्कराच्या वेस्टर्न थिएटर कमांडची असून त्या पर्वतीय क्षेत्राच्या हवाई वर्चस्वासाठी १५ व्या पीएलए एअरबोर्न कोअरला त्याच्या सुपूर्द केले आहे. पर्वतीय युद्धामध्ये छाताधारी सैनिकांना उतरवण्यासाठी एअरबोर्न कोअरकडे वाय १२ छोटी मालवाहतूक विमाने, ट्रक्स, आर्टिलरी गन्स आणि अवजड सामानासाठी वाय २० मोठी मालवाहतूक विमाने आहेत. चिनी एअरबोर्न ट्रुप्स शत्रूच्या कमांड सिस्टमला नष्ट करणे, त्याच्या महत्त्वाच्या साधनसामग्रीवर हल्ला करणे, त्याची रसद उद्ध्वस्त करणे, रात्रीच्या वेळी हातघाईचे युद्ध करणे, धोकादायक भूक्षेत्र चकमकी व शहरी युद्धात पारंगत आहेत.

जनरल झाओ जिन जुननुसार शत्रूच्या पिछाडीतील महत्त्वाची ठिकाणे एअरबोर्न ट्रुप्सचे मुख्य लक्ष्य आणि पिछाडी हे मुख्य युद्धक्षेत्र असते. त्या क्षेत्रात सक्षम टेहळणी, संपर्क साधने, चपळ हालचाली यांची प्रचंड वानवा असते. त्याच्या जोडीला धूसर वातावरण आणि खडतर जमिनीमुळे रसद व सामग्री पुरवठा अतिशय अल्प प्रमाणात केला जातो. प्रत्येक एअरबार्न युनिटला हवेतून केलेले युद्ध जिंकण्याची कार्यप्रणाली, शत्रूचे गुण-अवगुण आणि संभाव्य युद्धक्षेत्राची ओळख असावी लागते. त्याशिवाय एअरबोर्न ट्रुप्स शत्रूच्या पिछाडीतील युद्ध जिंकूच शकत नाही. प्रत्येक चिनी एअरबोर्न सैनिक पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीवर उतरताना ४०० मीटर्स उंचीवरून अचूक फायर करत शत्रूवर मारा आणि त्यानंतर प्रतिहल्ला करू शकतो.
चीनच्या लष्कराने त्यांच्या तीनही दलांच्या समन्वयी प्रशिक्षणाद्वारे सामरिक माहिती क्षेत्राचे संचालन, सामरिक क्षेत्र संचालन, प्रशिक्षण, सामरिक प्रकल्पांमध्ये वृद्धी, आधुनिक पुरवठा प्रणालीचा विकास आणि विविध प्रकारची सामरिक लक्ष्ये मिळवण्याची क्षमता यामध्ये सततच्या युद्धाभ्यासांद्वारे प्रावीण्य मिळवले आहे.

हे युद्धाभ्यास चीनचे हिंदुस्थानशी किंवा हिंदुस्थानचे त्याच्याशी युद्ध झाल्यास सामरिक वर्चस्वाची बाजी मारण्यासाठी केले जातात. हे युद्ध होण्यामागे अक्साई चीन अथवा अरुणाचाल प्रदेश क्षेत्राच्या ताब्यावरून दोघांमधली तेढ, चीनद्वारे पाकिस्तानला होणारा पारंपरिक व अण्वस्त्र शस्त्र पुरवठा, दलाई लामांना दिलेला राजाश्रय आणि चीनच्या तिबेटवरील सार्वभौमत्वाला आव्हान देणारे इतर कोणतेही हिंदुस्थानी कृत्य, हिंदुस्थानला पाणीपुरवठा करणाऱया नद्यांचा उगम आणि हिंदुस्थानकडे जाणाऱया जलप्रवाहात चीनची ढवळाढवळ यापैकी कोणतेही एक किंवा ही सर्वच कारणे असू शकतात.

१९६२ मध्ये अक्साई चीन आणि अरुणाचल प्रदेश या एकमेकांपासून १९२० किलोमीटर दूर असलेल्या दोन महत्त्वाच्या सामरिक क्षेत्रांत हिंदुस्थान-चीन युद्ध झाले. जम्मू-कश्मीरमधील लडाखच्या पूर्वेला स्वित्झर्लंडइतके क्षेत्रफळ असलेल्या अक्साई चीनवर चीनने १९५७-५८ मध्ये बेकायदेशीर कब्जा केला होता. तेव्हापासूनच दोन्ही राष्ट्रांमधील संघर्षाचे हे एक मुख्य कारण झाले आहे. हिंदुस्थानने चीनशी ‘पंचशील करार’ केला आहे. या करारानुसार चीनने हिंदुस्थानच्या पर्वतीय अथवा अन्य कुठल्याही सखल भूभागावर हक्क न दाखवण्याला मंजुरी दिली आहे. असे असूनही दगाबाज चीनने १९५६ पासूनच या क्षेत्रात नॅशनल हाय वे २१९ ची निर्मिती सुरू केली आणि १९५८ मध्ये अक्साई चीनला आपल्या नकाशात सामील केले. या गुप्त, घातकी खेळीद्वारे चीनने ‘आधी जमिनीवर कब्जा करून नंतर त्याला वैधानिक रूप देणे’ या विस्तारवादी धोरणप्रणालीचा ओनामा केला. ही धोरणप्रणाली दक्षिण चीन सागरात फिलिपिन्सच्या बेटावरील चिनी कब्जा, तद्नंतरचा जागतिक न्यायालयीन खटला व चीनने धुडकावलेल्या त्याच्या निकालामुळे जगाच्या नजरेस आली. मागील ६० वर्षांत चीनने लडाखच्या उत्तर व उत्तर पूर्वेस, झिंझियांग आणि तिबेटमध्ये उभी केलेली सैनिकी संसाधनीय आणि सामरिक ताकद हिंदुस्थानसाठी सामरिक व डावपेचात्मक चिंतेचे कारण बनली आहे.
हिंदुस्थान-चीन क्षेत्रीय संघर्षाचे दुसरे कारण असणाऱया अरुणाचल प्रदेशला चीन ‘दक्षिण तिबेट’ म्हणतो. याच्या पश्चिमेला भूतान, उत्तरेला तिबेट आणि पूर्वेला म्यानमार आहे. १९६२ च्या हिंदुस्थान-चीन युद्धानंतर मागील जवळपास ५५ वर्षे चीन अरुणाचल प्रदेशात सतत घुसखोरी व आक्रमक पेट्रोलिंग करत असतो. अरुणाचल प्रदेशावर कब्जा केला तर आसामच्या सखल भागात येण्यासाठी चीनला ब्रह्मपुत्रेच्या खोऱयातून येणारा दुसरा सामरिक रस्ता सहज उपलब्ध होऊ शकतो.

हिंदुस्थानचा आद्यशत्रू असणाऱया पाकिस्तानला होत असलेली चीनची सामरिक, हत्यारी, तांत्रिक, आण्विक व आर्थिक मदत हीदेखील कारणे चीन-हिंदुस्थानमधील संभाव्य युद्धाचे होऊ शकतात. हिंद महासागरात वर्चस्व स्थापन करण्यासाठी चीन पाकिस्तानमधील सीपीईसी आणि ग्वादार बंदराचा उपयोग करेल. त्यासाठी चीनने पाकिस्तानचा वापर एखाद्या आरंभ स्थानासारखा केल्यास ती दुसऱया हिंदुस्थान-चीन युद्धाच्या संभाव्यतेची पुष्टी होते.

हिंदुस्थान व चीनमध्ये खरंच युद्ध होईल का यावर दोन्ही संयमी देशांकडे आण्विक अस्त्र असल्यामुळे हे असंभव आहे असे मत काही तज्ञ मांडत असतात,. मात्र प्रत्येक वेळी हिंदुस्थान किंवा चीन संयम पाळतीलच याची खात्रीही कोणी देत नाही. चीन व हिंदुस्थानमध्ये हिमालय पर्वत शृंखलेचा उत्तुंग, अजिंक्य व अभेद्य नैसर्गिक अडथळा असला तरी चिनी सैन्य आता तो सहजरीत्या पार करू शकेल हे १५ व्या एअरबोर्न कोअरच्या ब्रिगेडस्नी केलेल्या युद्धसरावामुळे स्पष्ट झाले आहे. २०१४ मध्ये चिनी सैन्याने तिबेटमध्ये केलेल्या पहिल्या सामरिक युद्धसरावात येथील ५५०० मीटर उंच कारगील-सियाचीनसदृश मिलिटरी पिकेटस्वर हल्ला करून त्या काबीज करण्याचा अभ्यास केला होता. २०१५ मध्ये तिबेटमध्ये झालेल्या दुसऱया युद्धसरावात शस्त्र्ासज्ज वाहने आणि एअरबोर्न ट्रुप्सचा वापर करण्यात आला. या युद्धसरावात चीनने त्याच्या दक्षिण-पश्चिम सीमेजवळील लडाख, कारगील व सियाचीनसदृश क्षेत्रांमध्ये सामरिक डावपेच, चिनी सैन्यातील स्थलावकाशाचा समन्वय आणि दूर अंतरावरील सैनिकी दळणवळण यामध्ये प्रावीण्य मिळवले होते. या सर्वांचा कळस नव्या ताज्या युद्धाभ्यासात साधला गेला आहे.

या युद्धसरावानंतर चीनच्या विस्तारवादी धोरणाबद्दल परत एकदा शंका उत्पन्न हेणे स्वाभाविक आहे. त्यातच ‘फाइट ऍण्ड विन द वॉर्स ऑन इटस् बॉर्डर्स’ हे चीनचे नवे लष्करी ब्रीद झाल्यामुळे या शंकेला बळ मिळते. चिनी सैन्य आता जास्त हलकी, डावपेचात्मक हालचाली करणारी, आधुनिक हत्यारांनी परिपूर्ण झाले आहे. १५ व्या एअरबोर्न कोअरमधील प्रत्येक ब्रिगेडमध्ये रॅपिड रिऍक्शन फोर्स असतात. सीमेवरील आणि सीमापार चकमकी अथवा युद्धासाठी चिनी सैन्य हे एक प्रभावी हत्यार आहे. तिबेटसमोरच्या सर्व क्षेत्रांतील युद्धासाठी अवजड सामानाच्या चिनी दळणवळण क्षमतेत गेल्या दहा वर्षांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चीनच्या या सामर्थ्यवृद्धीचा विचार करता उद्या चीनने हिंदुस्थानविरुद्ध काही आगळीक अथवा आक्रमण केलेच तर त्याला तोंड देण्यासाठी हिंदुस्थान सज्ज आहे का याचे उत्तर येणारा काळच देईल.

ब्रह्मपुत्रेचे पाणी हेच संभाव्य कारण
भविष्यात चीनद्वारे अरुणाचल प्रदेशात आक्रमण करण्याचे आणखी एक कारण म्हणजे दोन्ही देशांतील संभाव्य जलविवाद असेल यात शंकाच नाही. चीनमधील असंख्य नद्या व तलाव पर्यावरणाच्या ऱहासामुळे ‘डेड झोन’ बनले असून नद्यांमधील जवळपास ४० टक्क्यांपेक्षा जास्त पाणी प्रदूषणयुक्त झाल्यामुळे पिण्यायोग्य राहिलेले नाही. हिंदुस्थानची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. ‘पोलार आइसकॅप्स’नंतर पिण्यायोग्य ताज्या पाण्याचा दुसरा मोठा साठा तिबेटमध्येच आहे, पण तिबेटवरील कब्जामुळे हिंदुस्थानच्या किमान एकतृतीयांश पाणीपुरवठय़ावर चीनची पकड मजबूत झाली आहे. सध्या चीन ब्रह्मपुत्रा नदीतील ६० टक्के पाणीवाटा त्याच्या यलो नदीमध्ये वळवण्यासाठी ब्रह्मपुत्रेवर धरणशृंखला तयार करण्याच्या विचारात आहे. हेच पाणी हिंदुस्थान-चीनमध्ये होणाऱया संभाव्य युद्धाचे प्रमुख कारण असणार आहे.

चीनने दरवर्षी ब्रह्मपुत्रेचे २०,००० दशलक्ष पाणी यलो रिव्हरमध्ये नेण्याचा चंग बांधला तर हिंदुस्थानच्या पूर्व क्षेत्रातील पर्यावरण आणि आर्थिक स्थितीची ऐशीतैशी होईल. या पाणीकपातीचा फटका बांगलादेशलादेखील बसेल. चीनची अरुणाचल प्रदेशावरील क्षेत्रीय अधिपत्याची इच्छा आणि ब्रह्मपुत्रा नदीवरील धरणशृंखलेमुळे हिंदुस्थानात निर्माण होणारी पाणीसमस्या यांची सांगड घातली तर चीन अरुणाचल प्रदेश हस्तगत करण्यासाठी एवढा उत्सुक का आहे हे लक्षात येते. अरुणाचल प्रदेश चीनच्या ताब्यात गेला तर ब्रह्मपुत्रा नदीवर धरणशृंखला तयार करून ते पाणी यलो रिव्हरमध्ये वळवण्याच्या चीनच्या भूमिकेला हिंदुस्थान जगातील कोणत्याही व्यासपीठावर आव्हान देऊ शकणार नाही हे या ठिकाणी लक्षात घ्यावे लागेल.

– [email protected]