
टीम इंडियातील निवडीसाठी प्रथम रणजी करंडक स्पर्धेचे सामने खेळण्याचा सल्ला टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी इशान किशनला दिला होता. बीसीसीआयनेदेखील प्रत्येक करारबद्ध, तंदुरुस्त असलेल्या खेळाडूने देशांतर्गत क्रिकेटमध्ये सहभाग घेण्यास सांगितले होते, मात्र इशान किशनने राहुल द्रविड यांच्यानंतर आता बीसीसीआयच्या आदेशाकडे पाठ फिरवत झारखंडकडून खेळणाऱया इशानने रणजी करंडकातील शेवटचा सामनाही न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच्या या निर्णयामुळे त्याचे काही खरे नसल्याचे चित्र तूर्तास उभे राहिले आहे. त्याच्या या मनमानीचा त्याच्या कारकीर्दीवर निश्चितच परिणाम जाणवण्याची दाट शक्यता आहे.
बीसीसीआयनेदेखील करारबद्ध खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. सध्या इशान हा किरण मोरे ऍकॅडमीत सराव करत असून तो फिट असल्याचे बोलले जात आहे. असे असतानादेखील इशानने रणजी सामने न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.




























































