स्वातंत्र्यदिन सोहळय़ात होणाऱया घातपाताचा कट दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने आज उधळून आला. रिझवान अली या दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी असलेल्या इसिसच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. रिझवान अली असे त्याचे नाव असून तो दिल्लीतील दर्यागंजचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रिझवान हा इसिसच्या पुणे मॉडय़ूलचा भाग होता आणि एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या मोस्ट वॉण्टेड यादीत त्याचा समावेश होता. त्याला पकडून देणाऱयास तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले होते.
रिझवानला आज सकाळी दिल्ली-फरीदाबाद सीमेवरून शस्त्रास्त्रांसह पकडण्यात आले. स्वातंत्र्यदिनापूर्वी राजधानीत त्याच्या उपस्थितीची चौकशी केली जात आहे. त्याच्यावर ‘यूएपीए’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एनआयएने रिझवान अलीचे छायाचित्रही प्रसिद्ध केले होते. वॉण्टेड यादीत एकूण चार दहशतवादी आहेत. त्यातील एकाला अटक करण्यात पोलिसांना यश आले. दरम्यान, रिझवानचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांचे छापे सुरू आहेत.
सुरक्षा दले अलर्ट मोडवर
78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत पोलीस आणि इतर सुरक्षा दले अलर्ट मोडवर आहेत. सुरक्षा दलांची राजधानीच्या प्रत्येक कोपऱयावर बारीक नजर आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येत आहे. सर्वसामान्यांना जागरूक ठेवण्यासाठी वॉण्टेड दहशतवाद्यांची जागोजागी पोस्टर्स लावण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.