
इस्रायल सैन्याचं हेलिकॉप्टर कोसळून दोन वैमानिक जवानांचा मृत्यू झाला. ही दुर्घटना सोमवारी रात्री उत्तर इस्रायलच्या समुद्र किनाऱ्यानजीक घडली. या अपघातातील तिसऱ्या क्रू सदस्याला वाचवण्यात यश आलं असून त्याची प्रकृती स्थिर आहे.
या दोन वैमानिकांची नावं लेफ्टनंच कर्नल इरेझ सॅचयाने आणि मेजर चेन फोजेल अशी आहेत. या दोघांनी सोमवारी रात्री आठ वाजता प्रशिक्षण तळाहून उड्डाण घेतलं होतं. तासाभरानेच ते अपघातग्रस्त झालं आणि समुद्रात कोसळलं. बचाव पथकांनी कर्नल आणि मेजर यांच्यासह तिसऱ्या क्रू सदस्याला पाण्याबाहेर काढलं. पण, इरेझ आणि चेन यांचा मृत्यू झाला.
या दुर्दैवी अपघाताचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. तरीही हा घातपात नसून अपघात आहे, असा दावा तज्ज्ञांनी केला आहे. कारण, उपलब्ध फुटेजनुसार, या हेलिकॉप्टरला आधी आग लागली आणि मग ते समुद्रात कोसळलं.
या हेलिकॉप्टरचं नाव युरोकॉप्टर AS565 पँथर असं असून त्याला अॅटलेफ किंवा बॅट (वटवाघूळ) असंही टोपणनाव आहे. हे एअरक्राफ्ट इस्रायलच्या नौदलाच्या युद्धनौकांवर उतरण्यासाठी सुसज्ज केलेलं आहे. याचा वापर बहुतांश वेळा समुद्र किनाऱ्यानजीकच्या युद्धांमध्ये केला जातो. या दुर्दैवी अपघातानंतर ही हेलिकॉप्टर्स सेवेतून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
























































