Israel Iran Conflict – देशात धार्मिक सभांमधून भडकाऊ भाषणे दिली जाण्याची शक्यता, केंद्र सरकारकडून राज्यांना सूचना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इस्रायल आणि अमेरिकेने इराणवर केलेल्या अलीकडील लष्करी कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना सावधगिरीचा इशारा देत सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 28 फेब्रुवारी रोजी पाठविण्यात आलेल्या पत्रात परदेशातील घडामोडींचे देशांतर्गत परिणाम होऊ शकतात, असा इशारा देण्यात आला आहे.

गृहमंत्रालयाने आपल्या पत्रात धार्मिक सभांमधून भडकाऊ भाषणे दिली जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे. विशेषतः “इराण समर्थक कट्टर प्रवचनकर्ते भडकाऊ प्रवचने देत असल्यास त्यावर लक्ष ठेवावे” असे राज्यांना सांगण्यात आले आहे. अशा भाषणांमुळे स्थानिक पातळीवर तणाव निर्माण होऊ शकतो किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

राज्य प्रशासनांनी गुप्त माहितीची देवाणघेवाण वाढवावी, संभाव्य संवेदनशील भागांवर लक्ष ठेवावे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मध्य पूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा इशारा देण्यात आला आहे. अमेरिकेने आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत इराणमधील काही शहरांवर आणि लष्करी पायाभूत सुविधांवर हल्ले केल्याचे वृत्त आहे. त्यानंतर प्रादेशिक संघर्ष तीव्र होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हिंदुस्थानने सर्व संबंधित पक्षांना संयम बाळगण्याचे आवाहन केले असून संवाद आणि कूटनीतीच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, अशी भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच आखाती देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या मोठ्या हिंदुस्थानी समुदायाच्या सुरक्षिततेलाही प्राधान्य देण्यात आले आहे.

नवी दिल्लीतील अधिकाऱ्यांकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे देशांतर्गत भावना भडकण्याची शक्यता असून काही अतिरेकी प्रवृत्ती त्याचा गैरफायदा घेऊ शकतात, अशीही चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

सरकारच्या सूचनांमध्ये नेहमीच्या कायदा-सुव्यवस्थेच्या तयारीसोबतच संवेदनशील काळात “सामुदायिक भावना भडकवणाऱ्या” भाषणांवर विशेष लक्ष ठेवण्यावर भर देण्यात आला आहे.

सुरक्षा तज्ज्ञांच्या मते, विविधतेने नटलेल्या हिंदुस्थानात जागतिक घटनांचा परिणाम स्थानिक पातळीवर झपाट्याने जाणवू शकतो. त्यामुळे योग्य वेळी प्रतिबंधात्मक पावले उचलणे आणि परिस्थितीवर नियंत्रण ठेवणे अत्यावश्यक ठरते.