
इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धामुळे आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता सध्या संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) अडकली आहे. युद्धाच्या या सावटात अडकलेल्या ईशाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली व्यथा मांडली असून, तिने सुरक्षित मायदेशी परतण्यासाठी ‘मला घरी जायचं आहे’ अशी आर्त साद घातली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईशा गुप्ता एका कामानिमित्त युएईमध्ये गेली होती. मात्र, त्याच वेळी इराण आणि इस्रायलमधील संघर्ष टोकाला गेल्याने अनेक देशांनी आपली हवाई हद्द बंद केली आणि विमानांची उड्डाणे रद्द करण्यात आली. यामुळे ईशाला तिथेच थांबावे लागले. या कठीण काळात युएई सरकारने ज्या प्रकारे परिस्थिती हाताळली आणि पर्यटकांच्या सुरक्षेची काळजी घेतली, त्याबद्दल तिने तिथल्या प्रशासनाचे आभारही मानले आहेत.
ईशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, सध्याची परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण आणि भीतीदायक आहे. युद्धाच्या ठिणग्या उडत असताना सुरक्षित राहणे हे मोठे आव्हान बनले आहे. तिने युएई सरकारच्या कार्यक्षमतेचे कौतुक केले असले तरी, आपल्या कुटुंबापासून दूर राहिल्याने तिने लवकरात लवकर हिंदुस्थानला परतण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
























































