
मध्यपूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी इराणला ठाम पाठिंबा जाहीर केला आहे. अमेरिकेसोबत सुरू असलेल्या तणावाच्या काळात रशिया इराणच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असे त्यांनी स्पष्ट केले. पुतिन यांनी सोमवारी दिलेल्या निवेदनात रशिया तेहरानसोबत एकजुटीने उभा असल्याचे सांगितले. “इराण आणि आमच्या इराणी मित्रांसोबत आमचा पाठिंबा आणि ऐक्य कायम राहील,” असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, इराणचे नवे सर्वोच्च नेते म्हणून नियुक्त झालेल्या मोजतबा खामेनी यांचेही पुतिन यांनी अभिनंदन केले. त्यांनी व्यक्त केलेल्या संदेशात, मोजतबा खामेनेई आपल्या वडिलांचे कार्य सन्मानाने पुढे नेतील आणि कठीण परिस्थितीत इराणी जनतेला एकत्र ठेवतील, असा विश्वास व्यक्त केला. इराणचे दिवंगत सर्वोच्च नेते अली खामेनी यांच्या निधनानंतर मोजतबा खामेनेई यांची नवीन नेतृत्वासाठी निवड करण्यात आली आहे. दरम्यान इस्त्रायलने खामेनेई यांच्या उत्तराधिकाऱ्याचा पाठलाग सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे.
यापूर्वी शुक्रवारी व्लादिमीर पुतिन यांनी मसूद पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली होती. या संभाषणात त्यांनी अयातोल्ला अली खामेनी त्यांच्या कुटुंबातील सदस्य, तसेच इराणमधील राजकीय आणि लष्करी नेते व अनेक नागरिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. मध्यपूर्वेतील तणाव वाढत असताना रशियाने इराणला दिलेला हा ठाम पाठिंबा आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्वाचा मानला जात आहे.
























































