
अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धाचा आज तिसरा दिवस आहे. युद्धाला तीन दिवस उलटूनही युद्धाची तीव्रता आणखी वाढत आहे. या युद्धामुळे आखाती देशात तणावाचे वातावरण आहे. तसेच तेलपुरवठ्यावर परिणाम झाल्याने जगाची चिंती वाढली आहे. एका अमेरिकन पत्रकाराने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येबद्दल विचारले तेव्हा ट्रम्प यांनी स्पष्ट उत्तर दिले. ट्रम्प यांनी दिलेल्या प्रतिक्रियेची चर्चा होत आहे.
ट्रम्प म्हणाले, ते मला मारणार होते, त्याआधी मी त्यांना मारले, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. इराणी सरकारने ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अमेरिकन गुप्तचर संस्थांच्या दाव्याचा उल्लेख करत त्यांनी हे उत्तर दिले. आमचा हल्ला अचूक आणि यशस्वी होता. अनेक अधिकारी आणि इराणचे संभाव्य उत्तराधिकारी त्यात मारले गेले. २०२४ मध्ये इराणने आपल्याला मारण्याचा कट रचला होता. त्यांनी मला मारण्यापुर्वीच मी त्यांना मारले. त्यांनी दोनदा प्रयत्न केले, पण मी त्यांना आधी मारले. मी त्यांना मारले नसते तर त्यांनी मला मारले असते, असे ट्रम्प म्हणाले.
इराणसोबतचे हे युद्ध किती काळ चालेल असे विचारले असता, ट्रम्प म्हणाले की त्यांना सुरुवातीला आशा होती की ते चार ते पाच आठवड्यात संपेल, परंतु आता त्यांनी संकेत दिले आहेत की आवश्यक असल्यास ते दीर्घकाळ चालू शकते. अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इराणवर हवाई हल्ले केले. या कारवाईत इराणमधील अनेक प्रमुख सरकारी आणि लष्करी प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले, ज्यामध्ये सर्वोच्च नेते खामेनी यांच्यासह अनेक उच्च राजकीय आणि लष्करी व्यक्तींचा मृत्यू झाला. यामुळे संतप्त झालेल्या इराणने आपल्या प्रत्युत्तरात्मक कारवाया वाढवल्या आहेत. इराण इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे आणि आखाती प्रदेशातील अमेरिकेच्या लष्करी तळांना लक्ष्य करत आहे.
























































