
गेल्या तीन दिवसांपासून इराण आणि इस्रायलमध्ये युद्ध सुरू आहे. इस्रायलच्या हवाई दलाने पूर्व इराणमधील मशहद विमानतळावर हल्ला केला आहे. ऑपरेशन रायझिंग लायनच्या सुरुवातीपासूनचा हा सर्वात लांब पल्ल्याचा हल्ला मानला जात आहे. इस्रायलने इंधन भरणाऱ्या विमानाला लक्ष्य केले आहे.
गेल्या 48 तासांपासून दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. इस्रायलने इराणच्या अणुऊर्जा केंद्रांसह इंधन साठ्यांवर हल्ले केले, तर इराणने प्रत्युत्तरात तेल अवीव आणि जेरुसलेमसह इस्रायलच्या अनेक शहरांवर शेकडो क्षेपणास्त्रे डागली. या संघर्षात दोन्ही बाजूंना मोठी जीवितहानी झाली आहे.
दरम्यान, इस्रायलने शुक्रवारी पहाटे ‘ऑपरेशन रायझिंग लायन’ अंतर्गत इराणच्या नतांझ येथील मुख्य अणुऊर्जा केंद्र, लष्करी तळ आणि इंधन साठ्यांवर हवाई हल्ले केले. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी हे हल्ले इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला रोखण्यासाठी आणि इस्रायलच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याचे सांगितले. या हल्ल्यांमध्ये इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सचे कमांडर-इन-चीफ होसैन सलामी आणि सशस्त्र दलांचे प्रमुख मोहम्मद बाघेरी यांच्यासह अनेक वरिष्ठ लष्करी अधिकारी आणि अणुशास्त्रज्ञ मारले गेले. इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या हल्ल्यांमध्ये 78 जणांचा मृत्यू झाला, तर 320 हून अधिक जण जखमी झाले. प्रत्युत्तरात, इराणने शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे इस्रायलवर सुमारे 100 ड्रोन आणि शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली.