
गाझा शांतता करारानुसार हमासने सर्व कैद्यांना इस्रायलकडे सोपवणे भाग आहे. मात्र हमास त्यात चालढकल करत असल्याने व त्यांनी सोपवलेल्या एका मृतदेहाची ओळख न पटल्याने इस्रायल सरकार संतापले आहे. हमासला पृथ्वीवरून नष्ट करून टाकू, अशी धमकी इस्रायली संरक्षण मंत्री इतमार बेन ग्वीर यांनी दिली आहे.
इस्रायल-हमासमध्ये शांतता कराराचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. हमासने सोमवारी 20 जिवंत कैद्यांना इस्रायलच्या हवाली केले. मात्र 28 मृत कैद्यांपैकी आतापर्यंत केवळ 7 जणांचे मृतदेह सोपवले आहेत. त्यातील एकाच्या मृतदेहाची ओळख पटू शकलेली नाही. तो नेमका कोणाचा मृतदेह आहे हे कळणे कठीण झाले आहे. त्यामुळे इस्रायल भडकला आहे.
इस्रायली इतिहासकाराला भीती
इस्रायली लेखक व इतिहासकार बेनी मॉरिस यांनी गाझा शांतता कराराच्या यशाबद्दल साशंकता व्यक्त केली आहे. इस्रायलचा सर्वनाश हेच हमासचे ध्येय आहे. ही संघटना शस्त्रे टाकणार नाही. त्यामुळे भविष्यात इस्रायल व पॅलेस्टिनमध्ये कायमस्वरूपी शांतता धूसर आहे, अशी भीती मॉरिस यांनी व्यक्त केली.
सगळं सुरळीत होताच हमास पुन्हा मूळ स्वभावावर गेला आहे. लबाडी, दगाबाजी आणि लोकांशी गैरवर्तन सुरू झालंय. खूप झालं. नाझी आतंकवादाला फक्त ताकदीची भाषा कळते. ह्यांना पृथ्वीवरूनच नष्ट करून टाकायला हवं.
– बेन ग्वीर, संरक्षणमंत्री -इस्रायल