आठवडाभरापासून उत्तर गाझा पाणी, विजेविना

महिनाभरापासून अधिक काळ इस्रायल आणि हमासच्या दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या रक्तरंजित संघर्षात आतापर्यंत नऊ हजारांहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. आज मंगळवारी इस्रायलने उत्तर गाझामध्ये कारवाया वाढवल्या. दहशतवाद्यांचा कसून शोध घेतला जात आहे. अधुनमधून हल्लेही चढवले जात आहेत. याचदरम्यान उत्तर गाझामधील नागरिक गेल्या आठवडाभरापासून पाणी आणि विजेवीना आहेत. मानवतावादाच्या दृष्टीने पोहोचवण्यात येणारी मदतही त्यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

उत्तर गाझामध्ये इस्रायलकडून रुग्णालयांवर हवाई हल्लेही सुरु आहेत. अल-शिफानंतर येथील इंडोनेशिया या रुग्णालयावरही इस्रायलने हल्ला चढवला. या हल्ल्यात रुग्णालयातील सर्जरी रूम पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. डॉक्टर, कर्मचाऱ्यांसह 12 जणांचा मृत्यू झाला. उत्तर गाझामधील स्थिती दिवसेंदिवस भयावर होत चालली आहे. रुग्णालयांमध्येही पाणी, अन्न, विजेचा तुटवडा असून जनरेटरही इंधनाअभावी बंद आहेत. त्यामुळे रुग्णालयातील मृत्यूचा आकडाही आणखी वाढू शकतो.

इंडोनेशियन रुग्णालयात शेकडो नागरिक आणि रुग्ण अडकल्याचे पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. सोमवारी 200 नागरिकांना रुग्णालयातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. रुग्णालयाबाहेर जबालिया परिसरात नागरिकांसाठी मदत छावण्या उभारण्यात आल्या आहेत. या नागरिकांचे अन्नपाण्यावाचून हाल होत आहेत. उत्तर गाझामध्ये 1 लाख 60 हजार नागरिक अद्याप मदत छावण्यांमध्ये आश्रयाला असून त्यांचे प्रचंड हाल सुरू असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे.