Israel-Iran war – इस्रायली सैन्य दलाने मागितली हिंदुस्थानची माफी, नेमकं प्रकरण काय?

इस्रायल आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाला आहे. दोन्ही देश एकमेकांवर हवाई हल्ले करत आहेत. यामुळे जग पुन्हा एकदा महायुद्धाच्या उंबरठ्यावर पोहोचले आहे. हा संघर्ष सुरू झाल्यानंतर इस्रायली सैन्य दल आपल्या एक्स (आधीचे ट्विटर) हँडलवरून याबाबत माहिती शेअर केली जात आहे. याच दरम्यान इराणपासून जगाला धोका असल्याची पोस्ट इस्रायली सैन दलाकडून करण्यात आली होती. यासोबत त्यांनी जगाचा नकाशाही शेअर केला होता. यातून त्यांनी इराणी क्षेपणास्त्रांचा आवाका दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र ही पोस्ट शेअर करताना एक चूक झाली. यात हिंदुस्थानची सीमा चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली. त्यामुळे हिंदुस्थानींनी संताप व्यक्त केला. आता यावर इस्रायली सैन्य दलाने पोस्ट करत माफी मागितली आहे.

इस्रायली सैन्य दलाने (आयडीएफ) शेअर केलेल्या नकाशामध्ये जम्मू-कश्मीर हा पाकिस्तानचा भाग असल्याचे आणि अरुणाचल प्रदेश हा चीनचा भाग असल्याचे दाखवण्यात आले होते. यावर हिंदुस्थानी युजर्सने तीव्र नाराजी व्यक्त करत आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर आयडीएफने माफी मागितली.

ही पोस्ट केवळ एका क्षेत्राचे चित्रण म्हणून पोस्ट करण्यात आली आहे. यात आम्ही कुठल्याही भागाचा, देशाचा नकाशा दाखवलेला नाही. तरी देखील या पोस्टमुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांची आम्ही माफी मागतो, अशी पोस्ट आयडीएफने केली आहे.

काय होती पोस्ट?

आयडीएफने 13 जूनला एक पोस्ट शेअर केली होती. याद्वारे इराण कोणकोणत्या देशांवर क्षेपणास्त्र डागू शकतो असे ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवण्यात आले होते. इराण हा जगासाठी धोकादायक असून इस्रायल हे त्यांचे पहिले व अंतिम टार्गेट नाही. ही सुरुवात आहे. आमच्याकडे त्यांच्यावर कारवाई करण्याशिवाय पर्याय नव्हता, असे कॅप्शनही यासह देण्यात आले होते. मात्र या ग्राफिक्समध्ये हिंदुस्थानचा काही भाग चुकीचा दाखवण्यात आला होता, आणि तो नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटला नाही. नेटकऱ्यांनी आक्षेप घेतल्यानंतर आयडीएफने स्पष्टीकरण देत माफी मागितली.

जग महायुद्धाच्या उंबरठ्यावर? मध्यपूर्वेत घमासान, बगदादवरही तुफान हल्ले; युरोपीय देशांकडून तयारी सुरू