
ऑक्सिओम-4 मिशन चौथ्यांदा पुढे ढकलण्यात आल्यानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) ने शनिवारी या मिशनची नवीन तारीख एक्सवर पोस्ट शेअर करून जाहीर केली आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकासाठी प्रक्षेपित होणारे ऑक्सिओम-4 मिशन आता 19 जून 2025 ला झेपावणार आहे. फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरमधून स्पेसएक्सच्या फाल्कन-9 रॉकेटचे प्रक्षेपण होणार आहे. 11 जून रोजी होणारे हे मिशन द्रव ऑक्सिजन गळतीमुळे पुढे ढकलण्यात आले होते. हिंदुस्थानचे अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांच्यासह या मिशनमध्ये चार देशांचे चार अंतराळवीर 14 दिवसांसाठी अंतराळ स्थानकात जाणार आहेत.