इथिओपियाचे मेडिकल लायसन्स पडले 30 लाखांना, दांपत्याने घातला गंडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इथिओपिया देशात 10 ते 15 टेस्ट ट्युब बेबी सेंटर असल्याचे सांगत दांपत्याने एकाला तेथील मेडिकलचे लायसन्स मिळवून देण्यासाठी 30 लाखांचा गंडा घातला. ही घटना 2018 ते जुलै 2021 कालावधीत बोपोडीत घडली.

याप्रकरणी सोमेंद्र सारस्वत (वय 43) आणि नेहा सारस्वत (दोघेही रा. जयरास कॉप्लेक्स, बोपोडी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. केदार गणला (वय 52, रा. मुंबई) यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

केदार आणि सारस्वत दांपत्याची मित्राच्या माध्यमातून ओळख झाली होती. त्यानंतर दांपत्याने केदार यांना इथिओपिया देशातील कॉन्सलेट यांच्यासोबत ओळख असल्याचे सांगितले. त्याशिवाय तेथील देशातील मेडिकल आणि लायसन्स मिळवून देण्याचे आमिष दाखवून 20 लाख रूपये आरटीजीएस पद्धतीने घेतले.

त्यानंतर काही दिवसांनी 10 लाख रूपये घेतले. मात्र, 2018 पासून जुलै 2021 पर्यंत सारस्वत दांपत्याने त्यांना इथिओपिया देशातील मेडिकलचे लायसन्स मिळवून दिले नाही. त्यानंतर केदार यांनी त्यांच्याकडे रक्कम मागितली असता, सारस्वत दांपत्याने त्यांना धनादेश दिला. मात्र, त्यांनी दिलेला धनादेश वठला नाही. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर केदार यांनी खडकी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक तांबे तपास करीत आहेत.