
सामना प्रतिनिधी । मालवण
शासकीय तंत्रनिकेतन कुंभारमाठ, मालवणचा विद्यार्थी रोहित सतीश तावडे (वय २०) महाविद्यालयातून बेपत्ता झाला आहे. रोहित हा गुरुवारी सकाळी महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांना दिसून आला होता. त्यानंतर तो महाविद्यालयातून अचानक गायब झाला. याबाबत त्याचा वडिलांनी मालवण पोलीस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.
रोहित तावडे हा नडगिवे-खारेपाटण (ता. कणकवली) येथील असून कुंभारमाठ येथील शासकीय तंत्रनिकेतन येथे द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल शाखेत शिक्षण घेत आहे. तो कुंभारमाठ येथे आपल्या सहकाऱ्यांसमवेत भाड्याच्या खोलीत राहतो. परीक्षा हंगामात सादर करावयाचा प्रकल्प पूर्ण न झाल्याने बुधवारी रात्री तो काहीसा चिंतेत असल्याचे त्याच्या साथीदारांनी सांगितले. गुरुवारी रोहित हा महाविद्यालयात आल्याचे काही विद्यार्थ्यांनी पाहिले होते. मात्र त्यांनतर तो महाविद्यालयात दिसून आला नाही.
रोहित हा महाविद्यालयातून गायब झाल्यानंतर त्याच्या सहकारी मित्रांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र तो कुठेच सापडून आला नाही. याबाबत विद्यार्थ्यांनी त्याच्या कुटुंबियांना तसेच प्राध्यापकांना माहिती दिली. शुक्रवारी दुपारी रोहितचे पालक मालवणात दाखल झाले. त्यांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याची पोलीसात तक्रार दिली आहे. शुक्रवारी सायंकाळी उशिरापर्यंत रोहितचा पत्ता लागला नव्हता.
मोबाईल बंद; कागदपत्रेही नेली
महाविद्यालयात सध्या परीक्षा सुरू असून बुधवारी रात्रीपासून तो अभ्यास न झाल्याने चिंतेत असल्याचे त्याच्या सहकाऱ्यांना दिसून आले. त्यानंतर काल सकाळी तो गायब झाल्याचे दिसून आले. रोहित परीक्षेच्या तोंडावर अचानक गायब झाल्याने सहकाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रोहित याचा मोबाईल बंद असून त्याने आपली सर्व कागदपत्रेही सोबत नेली आहेत, असे मित्रांनी सांगितले.

































































