जम्मू-कश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी सफरचंदाची बाग पेटवली

891

जम्मू-कश्मीरमधून 370 कलम हटवल्याने बिथरलेल्या दहशतवाद्यांनी व्यवसायिकांना आणि नागरिकांना लक्ष्य केले आहे. नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी दहशतवाद्यांनी शोपिया जिल्ह्यात सफरचंदाची बाग पेटवली. तसेच बागेत काम करणाऱ्या मजुरांनीही धमकावून पळवून लावले. या घटनेनंतर जम्मू-कश्मीरमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षा दलाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तसेच नागरिकांमध्ये सुरक्षेची भावना निर्माण व्हावी यासाठी जवान सातत्याने स्थानिकांच्या संपर्कात आहेत. त्याचबरोबर स्थानिकांकडून दहशतवाद्यांबाबत माहिती मिळवण्याचाही प्रयत्न जवान करत आहेत. दरम्यान जम्मू-कश्मीरमध्ये अद्यापही काही ठिकाणी मोबाईल सेवा बंद असल्याने जवानांना तात्काळ आवश्यक सूचना देण्यात अधिकाऱ्यांनाही अडथळे येत आहेत.

370 कलम हटवल्याने तंतरलेल्या दहशतवाद्यांनी सफरचंद बागमालकांना धमकावण्यास सुरुवात केली आहे. याविरोधात सफरचंद बागमालकांनी पोलिसात तक्रारही दाखल केली आहे. यामुळे चवताळलेले दहशतवादी अधिक आक्रमक झाले आहेत. याचपार्श्वभूमीवर शोपियातील एका गावात दहशतवाद्यांनी शनिवारी सफरचंदांची बाग पेटवली. बागेत ठेवलेले सफरचंदाचे 70 बॉक्सही यावेळी दहशतवाद्यांनी पेटवले. बागमालक सफरचंद विकण्यासाठी बाजारात जात असतानाच दहशतवाद्यांनी बाग पेटवली. तसेच शेतकऱ्यांना सफरचंद बाजारात न नेण्यासही दहशतवाद्यानी धमकावले. त्यानंतर दहशतवाद्यांनी आपला मोर्चा सरकारी इमारतींकडे वळवला आहे. 28 ऑगस्टला स्थानिकांसमोरच दहशतवाद्यांनी शोपियातील पंचायत भवनाला आग लावली होती.

काही समाजकंटकांना हाताशी घेऊन दहशतवादी जम्मू-कश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही तयार आहोत अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या