
सामना ऑनलाईन । पालघर
पालघर नगर परिषदेच्या येत्या 24 मार्च रोजी होणारी निवडणूक निर्भय, पारदर्शक आणि मुक्त वातावरणात व्हावी यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली आहे. रिसॉर्ट, बार आणि पालघरकरांच्या बँकेचे व्यवहार निवडणूक आयोगाच्या रडारवर आहेत, असा इशारा राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त ज.स. सहारिया यांनी दिला.
अवघ्या आठवडाभरावर येऊन ठेपलेल्या पालघर नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तयारीची माहिती घेण्यासाठी सहारिया येथे आले होते. त्यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, नगराध्यक्षपदासह 14 प्रभागांतील 28 जागांसाठी एकूण 90 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. यासाठी 62 मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून मतदानाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. भरारी पथकांसह इतर पथकेही या निवडणुकीसाठी सुरू असलेल्या प्रचारावर डोळ्यांत तेल घालून काम करत आहेत. निवडणूक काळात होणारी मोठी आर्थिक उलाढाल लक्षात घेता बँकेच्या व्यवहारांवर तसेच रिसॉर्ट आणि बारमध्ये सुरू असलेल्या पाटर्य़ांवरही निवडणूक आयोगाची नजर आहे असे त्यांनी स्पष्ट केले.
आज अखेरच्या सत्रातील प्रशिक्षण
निवडणुकीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे एक प्रशिक्षण सत्र 10 मार्च रोजी झाले. आता दुसरे प्रशिक्षण सत्र उद्या रविवारी 17 मार्च रोजी होणार असल्याचेही सहारिया यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हा पोलीस अधीक्षक गौरव सिंग, अप्पर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक श्रीधर डुबे-पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी विकास गजरे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
























































