आरक्षणासाठी विष घेतलेल्या जगन्नाथ सोनवणे यांचा मृत्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । देवगाव रंगारी

मराठा आरक्षणासाठी विष घेतलेले जगन्नाथ विश्वनाथ सोनवणे (५६) यांचा बुधवारी उपचार सुरू असताना मृत्यू झाला. शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर देवगाव रंगारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारी वेळगंगा पुलावर आंदोलन करण्यात आले. आंदोलन सुरू असतानाच जयेंद्र द्वारकादास सोनवणे या तरुणाने पुलावरून नदीपात्रात उडी मारली. तर आंदोलनस्थळापासून काही अंतरावर जगन्नाथ सोनवणे हे अत्यवस्थ स्थितीत आढळले होते. सोनवणे यांना उपचारासाठी तात्काळ घाटी रुग्णालयात पाठवण्यात आले. उपचार सुरू असतानाच आज पहाटे २ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. सोनवणे यांचा मृत्यू झाल्याचे कळताच गावात प्रचंड तणाव निर्माण झाला. मोठ्या बंदोबस्तात जगन्नाथ सोनवणे यांच्यावर दुपारी १ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनवणे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

जगन्नाथ सोनवणे यांना श्रद्धांजली अर्पण करताना मराठा मोर्चाचे समन्वयक मिलिंद पाटील, शिवसेनेचे विभागप्रमुख दीपक बोडखे, अभय पाटील चिकटगावकर, अशोक मगर, संजय गव्हाणे, उज्वला पाटील सोनवणे, देविदास जाधव, हभप भागवतानंदगिरी महाराज, उपसरपंच अनिस कुरेशी यांनी सरकारने तात्काळ आरक्षणाचा निर्णय घ्यावा व सोनवणे कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी तहसीलदार महेश सुधळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी एस. पी. सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक स्वप्ना शहापूरकर यांच्यासह दंगाकाबू पथक तैनात होते. दरम्यान, दोन्ही सोनवणे कुटुंबांना मदत मिळेपर्यंत देवगाव रंगारी येथील शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार कार्यकत्र्यांनी केला आहे.