नारंगी नदीच्या पाण्यातही वाढ, जगबुडीने धोक्याची पातळी ओलांडली

265

गेले चार दिवस कोकणात मुसळधार पाऊस पडत आहे. सकाळपासून सह्याद्रीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. शहराच्या दुसऱ्या बाजूने वाहणाऱ्या नारिंगी नदीच्या पाण्यातही वाढ झाली असल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

खेड शहरालगत वाहणारी जगबुडी नदीचा उगम सह्याद्रीच्या खोऱ्यातील बांद्री पट्ट्यात होतो. गेले चार दिवस या भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत आहे. या नदीची इशारा पातळी ६ मीटर तर धोका पातळी ७ मीटर आहे. आज दिवसभर सह्याद्रीच्या खोऱ्यात संततधार पाऊस सुरू असल्याने सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास जगबुडी नदीच्या पाण्याची पातळी ६.५ मीटरपर्यंत पोहचली. यामुळे नगरपालिका प्रशासन आणि व्यापारी यांच्या चिंतेत भर पडली.

नागरिकांना सतर्कतेचा इशारा
एका बाजूला जगबुडीचे पाणी वाढत असताना दुसऱ्या बाजूला असलेल्या नारंगी नदीच्या पाण्याचीही पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांची चिंता अधिकच वाढली आहे. या दोन्ही नद्यांच्या पाण्याची पातळी वाढू लागली की, शहराला पुराचा वेढा पडण्याचीही शक्यता अधिकच असते. पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे नसल्याने बाजारपेठेत पाणी घुसण्याची शक्यता लक्षात घेत नगरपालिका प्रशासनाने खेड शहरातील व्यापारी आणि नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या