
सामना ऑनलाईन। जयपूर
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने सोमवारी आयपीएलमध्ये सणसणीत शतक ठोकत टीकाकारांना चांगलेच उत्तर दिले. त्याचे हे आयपीएलच्या इतिहासातील दुसरे शतक ठरले. मात्र त्यांच्या शतकी खेळीनंतरही राजस्थान रॉयल्सला पराभवाला सामोरे जावे लागले. शिखर धवन, रिषभ पंत व पृथ्वी शॉ या तीन फलंदाजांच्या सुपर शोमुळे दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेतील सातव्या विजयाला रुबाबात गवसणी घातली. त्यांचे 14 गुण झाले. राजस्थान रॉयल्सचा सातवा पराभव झाला.
राजस्थान रॉयल्सकडून मिळालेल्या 192 धावांचा पाठलाग करणाऱया दिल्ली कॅपिटल्सने चार गडी गमावत विजयी लक्ष्य ओलांडले. सलामीवीर शिखर धवनने 54 धावांची व पृथ्वी शॉने 42 धावांची खेळी साकारत दिल्ली कॅपिटल्सला विजयाची पायाभरणी केली. रिषभ पंतने (नाबाद 78 धावा) यावर कळस चढवला. याआधी दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. राजस्थान रॉयल्ससाठी अजिंक्य रहाणे व स्टीवन स्मिथ या दोघांनी धडाकेबाज कामगिरी केली. अजिंक्य रहाणेने 63 चेंडूंत तीन षटकार व अकरा चौकारांसह नाबाद 105 धावा फटकावल्या. स्टीवन स्मिथने 50 धावांची खेळी करीत त्याला उत्तम साथ दिली.



























































