जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्याचा पंतप्रधान मोदींचा मानस; काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी सांगितला घटनाक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
jairam-ramesh-slams-pm-modi-over-delay-in-caste-census-explains-chronology

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून केंद्रातील मोदी सरकारला निशाणा बनवले आहे. पंतप्रधान मोदींनी लक्ष्य करताना त्यांनी X वरून पोस्ट केली आहे की, सरकारने जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचे जाहीर करून आता एक वर्ष उलटले आहे, परंतु ही गणना कशाप्रकारे केली जाईल याचा तपशील अद्याप देण्यात आलेला नाही. मोदी जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्याच्या प्रयत्नात असल्याचा त्यांचा पूर्ण मानस असल्याचा आरोपही रमेश यांनी केला आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी आठवण करून दिली आहे की, आजपासून बरोबर एक वर्षापूर्वी मोदी सरकारने जाहीर केले होते की आगामी जनगणनेत संपूर्ण लोकसंख्येची जातीनिहाय गणना समाविष्ट केली जाईल.

रमेश यांनी ‘X’ वरील आपल्या पोस्टमध्ये सारा घटनाक्रम मांडला आहे.

ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात की, २१ जुलै २०२१ रोजी, गृहमंत्र्यांनी लोकसभेत भाजप खासदार रक्षा निखिल खडसे (ज्या आता स्वतः मंत्री आहेत) यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले होते की, हिंदुस्थान सरकारने धोरणात्मक बाब म्हणून जातीनिहाय लोकसंख्येची गणना न करण्याचा निर्णय घेतला आहे.

२१ सप्टेंबर २०२१ रोजी, मोदी सरकारने सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका (सिव्हिल) क्र. ८४१/२०२१ मध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करून सांगितले की, न्यायालयाने जातीनिहाय जनगणनेचे दिलेले कोणतेही निर्देश हे मोदी सरकारने आधीच घेतलेल्या धोरणात्मक निर्णयात हस्तक्षेप करण्यासारखे असतील.

१६ एप्रिल २०२३ रोजी, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून नियमित जनगणनेचा भाग म्हणून अद्ययावत जातीनिहाय जनगणनेची मागणी केली होती.

२८ एप्रिल २०२४ रोजी, ‘न्यूज १८ नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधानांनी काँग्रेसवर हल्ला चढवला आणि म्हटले की, जातीनिहाय जनगणनेची मागणी हे ‘अर्बन नक्षल’ विचारांचे लक्षण आहे.

पंतप्रधानांनी त्यांच्या या आरोपाबद्दल काँग्रेसच्या नेतृत्वाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी जयराम रमेश यांनी केली आहे.

तसेच, त्यांनी हिंदुस्थानच्या जनतेला स्पष्टीकरण दिले पाहिजे की, जेव्हा त्यांनी ३० एप्रिल २०२५ रोजी जातीनिहाय जनगणनेचा समावेष करण्यासंदर्भात घोषणा केलेली, तेव्हा त्यांनी आपल्या मनात ‘अर्बन नक्षल’ विचार का येऊ दिले?, असा सवाल देखील केला आहे.

एक पूर्ण वर्ष उलटले आहे. ही जातीनिहाय गणना कशाप्रकारे केली जाईल, याचे तपशील अद्याप देण्यात आलेले नाहीत. या विषयातील तज्ज्ञांशी संवाद साधणे तर लांबच, पण विरोधी पक्ष आणि राज्य सरकारांशीही कोणतीही चर्चा झालेली नाही.

काँग्रेसच्या अध्यक्षांनी ५ मे २०२५ रोजी जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर पंतप्रधानांना पुन्हा पत्र लिहिले होते. त्या पत्राची साधी दखलही घेतली गेली नाही. त्या पत्रात उपस्थित केलेले मुद्दे आजही तितकेच वैध आहेत. किंबहुना, संसदेच्या नुकत्याच पार पडलेल्या विशेष अधिवेशनानंतर ते अधिक सुसंगत ठरले आहेत. यासर्व मुद्द्यांकडे लक्षं दिल्यास हे स्पष्ट होते की पंतप्रधानांचा जातीनिहाय जनगणना लांबणीवर टाकण्याचा पूर्ण मानस आहे, असा आरोप जयराम रमेश यांनी केला आहे.