
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अफगाणिस्तानमधील जैश ए मोहम्मदचा कमांडर अब्दुल रशीद गाझी याने पुलवामातील दहशतवादी हल्ल्याची योजन आखल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी वर्तवली आहे. या हल्ल्यासाठी गाझी हा डिसंबर महिन्यात कश्मीर खोऱ्यात आल्याचे देखील समजते.
काही महिन्यांपूर्वी जैश ए मोहम्मदची एक रॅली पाकिस्तानात आयोजित करण्यात आली होती. त्या रॅलीत ‘बडा होना चाहिये हिंदुस्थान रोना चाहिये’ अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. त्या रॅलीत दहशतवादी अफझल गुरुला फाशी दिली त्याच दिवशी म्हणजे 9 फेब्रुवारीला हिंदुस्थानात मोठा हल्ला करण्याचा कट रचला होता. जैश ए मोहम्मदचे कमांडर व मसूद अझरचे भाचे तल्हा आणि उस्मान यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी हा कट रचला होता. उस्मानच्या हत्येनंतरच अझरने हिंदुस्थानला याची किंमत चुकवावी लागेल असा इशारा दिला होता. त्यासाठी अझरने 9 डिसेंबरला गाझी याला हिंदुस्थानात पाठविले. गाझी हा शक्यतो सर्वत्र पायी फिरायचा किंवा सार्वजनिक वाहनांचा वापर करायचा.या हल्ल्यात जैश ए मोहम्मदच्या अफझल गुरु स्क्वॉडचा देखील सहभाग असल्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.
























































