मसूद अजहरच्या मृत्यूच्या बातमीचे जैश-ए-मोहम्मदकडून खंडन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । इस्लामाबाद

जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहर याचा मृत्यू झाल्याचे वृत्त रविवारी दुपारनंतर हिंदुस्थानातील सर्व प्रसारमाध्यमांवर दाखविण्यात आले. या वृत्ताला कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नव्हता. मात्र जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून एक पत्रक जारी करण्यात आले असून मसूदच्या मृत्यूच्या बातमीचे खंडन करण्यात आले आहे. त्यामुळे आता मसूद नक्की मेला आहे की जिवंत आहे हे स्पष्ट झालेले नाही.

हिंदुस्थानात अनेक हल्ले करणारा मसूद अजहर याच्या तळांवर हिंदुस्थानने हवाई हल्ले केले. यात जैशचे महत्त्वाचे अड्डे उध्वस्त झाले. या हल्ल्यांमध्ये मसूदचे अनेक नातेवाईक व कमांडरही मारले गेले. याच हल्ल्यात मसूदचा देखील मृत्यू झाला व हिंदुस्थानला त्याचे श्रेय मिळू नये म्हणून पाकिस्तानने ती बाब लपवून ठेवली असल्याचे बोलले जात आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी मसूद अजहर हा खूप आजारी असून त्याला किडनीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले होते. तसेच तो सध्या डायलिसीसवर असल्याचेही समोर आले होते. त्यामुळे मसूदचा किडनी विकाराने मृत्यू झाल्याचीही चर्चा आहे.