
सामना ऑनलाईन । श्रीनगर
दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचच्या सात आत्मघातकी दहशतवाद्यांच्या एका गटाने जम्मू कश्मीरमध्ये घुसखोरी केल्याचं वृत्त आहे. ईद किंवा हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य दिनी खूप मोठा हल्ला करण्याची शक्यता गुप्तचर सूत्रांनी वर्तवली आहे.
नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सात आत्मघातकी दहशतवाद्यांचा एक गट बनिहाल येथील दक्षिण भागात पीर पंजाल येथील पर्वतराजींच्या मार्गाने घुसखोरी केली आहे. हा गट पूंछ जिल्ह्यातील राजौरीमध्ये घुसखोरी केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या सगळ्या मोहिमेत जैशच्या म्होरक्या मसूद अझहरचा भाऊ अब्दुल्ल रऊफ हाही सामील आहे. तोच या सगळ्या दहशतवादी कारवायांवर नियंत्रण ठेवून आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली आहे. या सगळ्या कारवायांना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा आयएसआयचं संपूर्ण समर्थन असल्याचीही माहिती मिळत आहे. आयएसआयने मसूद अझहरला जास्तीत जास्त नागरिक मारले जावेत, असे हल्ले करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
घुसखोरी करणारा हा गट परिसरातील मोठ्या मशिदींवर हल्ला करू शकतो, असा अंदाज सुरक्षा दलाने वर्तवला आहे. जेणेकरून मशिदीवर हल्ला करून ते आरोप हिंदुस्थानच्या पदरात टाकता येतील. किंवा हा गट अनंतनाग परिसरात सामान्य नागरिक किंवा सुरक्षा दलांच्या चौक्यांवर हल्ला करू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.


























































