
सामना ऑनलाईन। जकार्ता
इंडोनेशियाची राजधानी जकार्तात येत्या १८ ऑगस्टपासून आशियाई क्रीडा स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत ४५ देशांचे ११ हजार अॅथलिटस सहभागी होणार आहेत. आशियाई क्रीडा ग्राम ज्या सेनतायोंग नदीच्या काठावर उभारले गेले आहे ती नदीच ९६ टक्के प्रदूषित असल्याने तिला काळी नदी असे संबोधले जाते. अन्य देशाच्या खेळाडूंना या मैल्या नदीचे दर्शन होऊ नये म्हणून क्रीडा ग्रामालगतचे नदीचे पूर्ण पात्र जाळ्यांनी झाकून ठेवण्यात आले आहे. जकार्ता प्रशासनाच्या या अनोख्या कृतीवर पूर्ण इंडोनेशियातून टीकेचा भडीमार होत आहे. ही नदी साफ आणि शुद्ध करण्याचा प्रकल्प आशियाड नंतर राबवला जाईल असे जकार्ता प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
येत्या १८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०१८ या कालावधीत इंडोनेशियाची राजधानी जकार्ता आणि सुमात्रा या शहरांत आशियाडच्या स्पर्धा पार पडणार आहेत.परदेशी पाहुण्यांनी सेनतायोंग नदीचे ओंगळवाणे आणि प्रदूषित रूप दिसू नये असे इंडोनेशियन सरकारला वाटते. आता कमी वेळात हि नदी पूर्ण स्वच्छ करणे शक्य नसल्याने तिचे आशियाई क्रीडा ग्रामालगतचे पात्र गडद रंगाच्या जाळीने झाकण्याचा निर्णय जकार्ता प्रशासनाने घेतल्याचे शहराचे गव्हर्नर अनिस बासवेदान यांनी सांगितले. मागच्या सरकारनी जनहिताची कामे केली असती तर सेनतायोंग नदीची अशी दुर्दशा झाली नसती असे स्पष्टीकरण गव्हर्नर बासवेदान यांनी टीकाकारांना उत्तर देताना केले आहे.
काळ्या नदीची पूर्वपीठिका
सेनतायोंग नदीत कारखान्यांचे रसायनमिश्रित पाणी आणि नागरिकांच्या घरातून येणारे सांडपाणी वर्षानुवर्षे सोडण्यात येत आहे .त्यामुळेच या नदीच्या पात्राला घाणेरड्या नाल्याचे रूप आले आहे .तिच्या शुद्धीकरणासाठी ३० हजार पौंड्स ( सुमारे २७ लाख रुपये ) इतकी तरतूद करण्यात आली आहे .त्यात नदीवर पाणीशुद्धीकरण प्लांट्स बसविणे आणि बाजूच्या जावा बंधाऱ्याचे पाणी नदीत सोडणे अशा उपाययोजना राबवण्याचे इंडोनेशियाच्या नॅशनल प्लांनिंग अँड डेव्हलपमेंट बोर्डाने ठरवले आहे .पण आशियाई क्रीडा स्पर्धा तोंडावर आल्याने आता सेनतायोंग नदी शुद्धीकरणाचे काम करायला वेळच उरलेला नाही असे जकार्ता प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
























































