जालन्यात तब्बल 49 ऑक्सिजन सिलेंडर जप्त

जालना शहरातील गरीब शहा बाजार परिसरात एका गोदामात साठवलेले तब्बल 49 ऑक्सिजन सिलेंडर अन्न व औषध प्रशानसन विभागाच्या अंजली मिटकर यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास जप्त केले आहेत. या प्रकारामुळे जालना जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

जालना शहरातील दोन पत्रकार रविवारी रात्री डी.एस.पी. कार्यालयाच्या दिशेने जात असताना त्यांना गरीब शहा बाजारात अंधारात एका वाहनात ऑक्सिजन सिलेंडर लोड करताना दिसले. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता 15 ऑक्सिजन सिलेंडर बेवारस आढळून आले. तर सिलेंडर घेऊन जाण्यासाठी आलेले युवक हे उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने त्यांचा संशय बळावला. त्यांनी सतर्कता राखत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या निरीक्षक अंजली मिटकर यांना तात्काळ फोन करून या ठिकाणी कुणी ऑक्सिजन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतं का याबाबत माहिती घेतली. परंतु त्या पत्त्यावर कुणाच्याही परवान्याची नोंदणी नसल्याचे त्यांनी सांगितले.

त्यांनतर औषध निरीक्षक अंजली मिटकर यांनी रविवारी रात्री 10.30 वाजता गरीब शहा बाजारात तत्काळ धाव घेतली. त्यांनतर तहसीलदार श्रीकांत भुजबळ आणि सदर बाजार पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. तिथे शोध घेतला असता एका बंद गोदामात आणखी काही जंबो सिलिंडर आढळून आले. अधिकाऱ्यांनी तात्काळ दोन लोडींग वाहने बोलावून तेथून तब्बल 41 जंबो सिलिंडर आणि 8 छोटे सिलिंडर असे लक्षावधी रुपयाचे सिलिंडर जप्त केले. घटना स्थळाचा पंचनामा करून हे सिलिंडर जालना तहसील कार्यालयात पाठविण्यात आले. हे सिलिंडर कुणाच्या मालकीचे आहेत याचा शोध अधिकारी घेत आहेत.

संबंधित व्यक्ती विरोधात कठोर कारवाई

आम्ही मध्यरात्री 49 ऑक्सिजन सिलिंडर जप्त करून गोदाम सील केले आहे. जर ऑक्सिजनचा काळा बाजार होत असेल तर संबंधित व्यक्ती विरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या