
जालना जिल्ह्यातील परतुर येथील उपविभागीय कृषी अधिकारी गजानन मारुती सोनकांबळे यांना शेतकऱ्याकडून पोखराच्या योजनेची मंजुर देण्यासाठी एक लाखांची लाच घेतांना जालना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी सायंकाळी वाटूर रोडवरील मांडवा देवी संस्थान रोहिणा परतुर येथे रंगेहाथ पकडले. आरोपी लोकसेवक गजानन मारुती सोनकांबळे (28) उपविभागीय कृषी अधिकारी परतूर वर्ग-1 असे लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील तक्रारदार याचे वरूड गाव शिवारात गट क्रमांक 97 मधील शेत जमिनीत शासनाच्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत मंजूर असलेल्या शेडनेट हाउसचे 75 टक्के प्रमाणे सात लाख रुपये अनुदान लाभार्थी म्हणून मिळण्याकरिता अंतिम मोका तपासणी केली. त्यानंतर एम.बी ऑनलाइन करून अनुदान मंजूर होण्यासाठी उपविभागीय अधिकारी गजानन सोनकांबळे यांनी 16 ऑगस्ट रोजी पंचासमक्ष तक्रारदारास 1 लाख रुपयांची मागणी केली. 17 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6.30 ते 6.45 वाजेच्या दरम्यान परतुर -वाटुर रोडवरील मांडवा देवी संस्थान मंदिर रोहिना ता. परतुर जि. जालना येथे पंचांसमक्ष एक लाख रुपये लाचेची रकमेची बॅग त्यांच्या ताब्यातील फोर्ड कंपनीच्या पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये ठेवण्यास सांगितले. त्यावेळी सापळा रचून सोनकांबळे यांना रंगेहाथ पकडले. परतुर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रात्री उशीरा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या तक्रारीवरुन उपविभागीय कृषी अधिकारी सोनकांबळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. राहुल खाडे, अपर पोलीस अधिक्षक विशाल खांबे, पोलीस उपअधिक्षक सुदाम पाचोरकर, सापळा पथक पोलीस निरीक्षक शंकर म. मुटेकर, पोलीस अमंलदार गजानन घायवट, गजानन कांबळे ,गणेश भुजाडे, जावेद शेख, प्रवीण खंदारे यांनी केली.




























































