
जालन्यात एका तरुणाची झोपेत असतानाच हत्या केल्याची धक्कादायक घटना टीव्ही सेंटर भागात घटना आज 7 मे रोजी पहाटे घडली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जालना शहरातील सिरसवाडी रोडवरील टीव्ही सेंटर भागातील 40 वर्षीय प्रमोद झिने यांचा आज सकाळी झोपेतच खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली. प्रमोद जनार्धन झिने हे आपल्या राहत्या घराच्या अंगणात रात्री बाजीवर झोपलेले होते. रात्री मारेकऱ्यांनी झोपेत असलेल्या झिने यांच्या डोक्यावर, मानेवर आणि शरीरावर अनेक ठिकाणी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.तरूणाच्या कानावर आणि जबड्यावर तिक्ष्ण हत्याराचे वार असून शरीरावरील घाव खोलवर असल्याचे दिसून येत आहेत. आज सकाळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांना झिने यांचा मृतदेह आढळून आला. विशेष म्हणजे पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर ही घटना घडली आहे.
या घटनेची माहिती मिळताच, तालुका जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रमेश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक हरीश राठोड, पोलीस उपनिरीक्षक वनवे, पोलीस हवालदार रामराव चापलकर, उदलसिंग जारवाल, वसंत धस, विलास आटोळे यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी भेट दिली. तालुका पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सरकारी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणातील अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.




























































