जळगावात आढळला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

2102

जळगाव येथील जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत तीन कोरोना संशयितांचे थ्रोट स्वाब नमुने पुण्याच्या एनआयव्ही प्रयोगशाळेत 27 मार्च रोजी तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या तीन पैकी दोन जणांची चाचणी निगेटिव्ह आली असुन एका 49 वर्षीय व्यक्तीला मात्र कोरोना संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. यामुळे जळगावात एकच खळबळ उडाली आहे.

जळगाव शहर व जिल्ह्यामधील 20 हून अधिक कोरोना संशयितांची आजवर तपासणी करण्यात आली होती. जळगाव शहरातील तीन नागरिकांना जिल्हा शासकीय रुग्णालयांमध्ये कोरोना संशयित म्हणून 27 मार्च रोजी दाखल करण्यात आले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पथकाने या तिघांच्याही थ्रोट स्वाबचे नमुने पुणे येथील एनआयव्ही प्रयोगशाळेकडे पाठवले होते. आज 28 मार्च रोजी एनआयव्हीचा अहवाल जळगावच्या जिल्हा शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला आहे. यामध्ये एका 49 वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून त्याला कोरोना संसर्ग झाल्याचे उघड झाले आहे. तर इतर दोघांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. दरम्यान, कोरोना संसर्ग झालेला रुग्ण जळगाव शहराच्या मेहरून भागातील असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. ही माहिती उघड झाल्यावर जिल्हा शासकीय रुग्णालय,  महानगरपालिका  व जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसेच पोलिसांकडून मेहरून भागात लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. जळगावात आढळलेल्या कोरोना रुग्ण व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नागरिकांची माहिती मिळण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू करण्यात आले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या