पर्यावरण संवर्धनासाठी झाडांची भिशी, जळगावातील डॉक्टर, उद्योजकांचा अभिनव उपक्रम

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आजवर आपण पैसे, दागिने किंवा पुस्तकांच्या भिशीबद्दल ऐकले आहे, परंतु जळगावात चक्क झाडांशी भिशी हा अभिनव उपक्रम सुरू झाला आहे. पर्यावरणाच्या संवर्धनासाठी काही डॉक्टर आणि उद्योजकांच्या सहकार्याने जुलैपासून या उपक्रमाला सुरुवात झाली आहे. त्याअंतर्गत आतापर्यंत जळगाव शहर आणि परिसरातील मोकळ्या जागेत तब्बल सहाशेहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या आगळय़ावेगळय़ा उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जळगावातील डॉ. जयंती चौधरी यांच्या पुढाकाराने झाडांची भिशी हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाबाबत ‘दैनिक सामना’शी बोलताना डॉ. चौधरी म्हणाल्या,  पर्यावरणाचे संवर्धन करणे हे आपल्या आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी खूप गरजेचे आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून मी पर्यावरण संवर्धनासाठी काम करतेय. विजयेंद्र फाऊंडेशनच्या माध्यमातून स्वखर्चाने शाळा, सोसायटी आणि पोलीस स्टेशनच्या परिसरात शेकडो झाडांची लागवड केली आहे. ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या म्हणीप्रमाणे पुढे या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी मी आणखी काही पर्यावरणप्रेमींना सोबत घ्यायचे ठरवले. पुढे त्या म्हणाल्या, झाडांची भिशी या उपक्रमासाठी मला बीडमधील डॉ. सुनीता बारकुल यांच्याकडून प्रेरणा मिळाली. त्यादेखील तिथे अशाच प्रकारचा उपक्रम काही वर्षांपासून राबवत आहेत. परभणीतदेखील काही डॉक्टरांनी झाडांची भिशी सुरू केली आहे.  सध्या आमच्या ग्रुपमध्ये 20 सदस्य असून त्यात डॉक्टर, उद्योजक, तरुण, गृहिणी, पोलीस आदींचा समावेश आहे. याशिवाय मदतीसाठी पाच ते सहा स्वयंसेवक आहेत.

झाडांची भिशी या उपक्रमांतर्गत प्रत्येक सदस्याकडून दरमहा 500 रुपये गोळा केले जातात. ज्यांच्या नावाचा ड्रॉ निघाला त्यांच्या पसंतीची योग्य वाढ झालेली रोपं खरेदी केली जातात. या रोपांची लागवड शहरातील मोकळ्या जागा, शाळा, पोलीस स्टेशन, मंदिर किंवा सोसायटय़ांच्या आवारात केली जाते.

शोभिवंत झाडांपेक्षा दीर्घकाळ टिकणाऱया कडुलिंब, बकुळ, चिंच, पिंपळ, बेहडा, अर्जुन, साग, जांभूळ, भोकर अशा झाडांची लागवड केली जाते. रोज सकाळी 8 ते 10 या वेळेत तसेच वीकेण्डला सदस्यांकडून वृक्षारोपण केले जाते. विशेष म्हणजे लागवड केलेल्या रोपांची ठरावीक अंतराने पाहणी केली जाते. एखादं रोप नीट रुजले नसेल तर त्या ठिकाणी दुसरे रोप लावले जाते.