नगर जिह्यात जलजीवन मिशनचा बट्टय़ाबोळ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांची जाहीर कबुली

 नगर जिह्यामध्ये जलजीवन योजनेचा बट्टय़ाबोळ उडालेला आहे. ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने कारभार केला आहे. अनेक ठिकाणी निकृष्ट पाईप वापरले असून, त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. कामाचे नकाशे अधिकाऱयांऐवजी ठेकेदारांकडे आहेत. ही योजना महत्त्वाची असताना जनता मात्र या योजनेबद्दल समाधानी नाही, अशी जाहीर कबुली विखेंनी दिली.

पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग तसेच जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत महासंस्कृती महोत्सव व कृषी आणि उमेद महिला बचतगट महोत्सव 2024चे आयोजन करण्यात आले होते. याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार शिवाजीराव कर्डिले, आमदार संग्राम जगताप, खासदार सुजय विखे, शहराध्यक्ष अभय आगरकर, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर उपस्थित होते.

यावेळी राधाकृष्ण विखे म्हणाले, ‘नगर जिह्यामध्ये मी जलजीवन योजनेचा आढावा घेतल्यावर लक्षात आले, या योजनेचा बट्टय़ाबोळ उडालेला आहे विशेष म्हणजे अनेक ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने कारभार केलेला आहे. आलेले पाईपसुद्धा निकृष्ट दर्जाचे आहेत, त्याच्यावर कुणाचे नियंत्रण नाह़ी कामाचे नकाशे अधिकाऱयांकडे ऐवजी त्या ठेकेदाराच्या घरी आहेत. कुठल्याही कार्यालयामध्ये याची नोंद नाही यासारखे दुर्दैव नाही. जलजीवन योजना ही अत्यंत महत्त्वाची योजना असताना जनता मात्र या योजनेबद्दल समाधानी नाही, अशी कबुली त्यांनी दिली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत ही योजना चालू आहे, तेथेही अशाच पद्धतीचा गोंधळ आहे. एकंदरीतच अशा कारभारामुळे सरकारची प्रतिमा ही मलिन झालेली आहे असे ते म्हणाले.

ग्रामसेवक व तलाठी हे अतिशय महत्त्वाचे सरकारचे घटक आहेत़  त्यांनी सरकारच्या योजना या तळागाळापर्यंत पोहोचल्या, तर त्याला अर्थ आहे. त्यांनीच काम केले नाही, तर सरकारचीही प्रतिमा काम न करणारी राहील, त्यामुळे हा घटक अत्यंत महत्त्वाचा आहे.

नगर जिह्यामध्ये सांस्कृतिक व धार्मिक ठेवा आहे, तो ठेवा जतन करण्याचे काम तुम्हा-आम्हाला करायचे आहे ते आपल्याकडून व्यवस्थितरीत्या होत नाह़ी  त्यासाठी अधिकाऱयांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. नेवासामध्ये संत ज्ञानेश्वरांनी जगाला संदेश देणारी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ पैस खांबाला टेकून लिहिला, तेथे आपण गेलेलो नाही. त्याचा साधा विकास आपण केलेला नाही, आज येथे येणारा भाविक हा श्रद्धेने येतो, मग आपण त्यासाठी काम करायला नको का? असे ते म्हणाले. अधिकाऱयांनी सर्व धार्मिक स्थळांबाबत अभ्यास करून धार्मिक व पर्यटन वाढविण्याच्या दृष्टिकोनातून कशा पद्धतीने मदत होईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ग्रामीण भागाचा चेहरा जर आपल्याला बदलायचा असेल तर ग्रामपातळीपासून जे जे घटक कार्यरत आहे ते आपल्याला महत्त्वाचे आहेत असे ते म्हणाले. यावेळी जिह्यातील ग्रामसेवकांचा सत्कार पालकमंत्री विखे यांच्या हस्ते करण्यात आला.