‘जलजीवन मिशन’ अंतर्गत 240 गावांचा पाणीप्रश्न सुटला; नगर झेडपी सीईओ येरेकर यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जिल्ह्यात सुरू असलेल्या ‘जलजीवन मिशन’ अंतर्गत 830 पाणी योजनांपैकी 225 पाणी योजनांची यशस्वी चाचणी नुकतीच करण्यात आली. त्यामुळे या 225 योजनांद्वारे 240 गावांतील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिली.

केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्यामार्फत जिह्यात ‘जलजीवन मिशन’ योजना राबवण्यात येत आहे. यात जिल्हा परिषदेमार्फत 830 योजना 927 गावांमध्ये सध्या प्रगतिपथावर आहेत. या योजनांमार्फत अतिदुर्गम, दुष्काळी, तसेच वाडय़ा-वस्त्यांना प्रतिमाणसी 55 लिटर प्रतिदिन शुद्ध पाणीपुरवठा करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. गेल्या वर्षभरापासून या योजनांची कामे सुरू होती.

नुकतीच यातील सुमारे 225 योजनांची यशस्वी चाचणी करण्यात आली. त्यामुळे या योजनांद्वारे संबंधित गावांतील नागरिकांना पिण्याचे पाणी उपलब्ध झाले आहे. नजीकच्या काळात योजनांची किरकोळ उर्वरित कामे पूर्ण करून लोकप्रतिनिधींच्या हस्ते या योजना कार्यान्वित होणार आहेत. या 225 योजनांच्या माध्यामातून 240 गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार असून, यातील बहुतांश गावांना स्वातंत्र्यानंतर प्रथमच नळाद्वारे शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. उर्वरित योजना डिसेंबर 2023 अखेर पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी दिली.

ही गावे होणार टँकरमुक्त

या योजनेमुळे बहुतांश गावे टँकरमुक्त होणार आहेत. नुकतेच मुधोळवाडी (ता. संगमनेर), नवसारवाडी, औटेवाडी व नेटकेवाडी (ता. कर्जत) ही गावे टँकरमुक्त झाल्याचा दावा जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.

पाणी योजनेची चाचपणी झालेली गावे

कोपरगाव 20, संगमनेर 23, पाथर्डी 16, श्रीगोंदा 20, पारनेर 10, श्रीरामपूर 13, जामखेड 20, कर्जत 21, नगर 17, नेवासा 12, राहुरी 24, शेवगाव 15, राहाता 6 आणि अकोले 8 अशा 225 गावांचा यात समावेश आहे.

‘जलजीवन मिशन’मुळे जिह्यातील 225 योजनांची चाचणी यशस्वी झाल्याचे समाधान आहे. शासन निर्देशानुसार जिह्यातील योजना उत्तमप्रकारे पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. पाणी योजनांसंदर्भात नागरिकांच्या काही सूचना असल्यास त्याबाबत दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करण्यात येईल.