जालन्यात कोविड-19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

717

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली असून ही बाब निश्चितच चिंतेची आहे. आगामी काळात कोरोनाचे आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी हा लढा सकारात्मकरीत्या लढावा लागेल. मार्च महिन्यात केवळ आपल्या राज्यात कोरोनाची चाचणी करणाऱ्या दोनच लॅब होत्या. आज त्यांची संख्या 110 वर पोहचली आहे. येणाऱ्या काळात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी कोरोनाची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा उभारल्या जाणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

12 जुलै 2020 रोजी जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोव्हीड-19 आरटीपीटीसीआर प्रयोगशाळेचे ई पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे, आमदार राजेश राठोड, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलिस अधिक्षक एस. चैतन्य, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, प्र. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष कडले, डॉ. जगताप, नगर परिषद मुख्याधिकारी नितीन नार्वेकर,डॉ. हयातनगरकर, डॉ. संजय राख, डॉ. रायठठ्ठा, डॉ. मोजेस, डॉ. चव्हाण, उपअभियंता चंद्रशेखर नागरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, खरोखरच जालना शहरात आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून नागरिकांना कोरोना विषाणुची तपासणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संपूर्ण जगावर कोरोनाचे मोठे संकट असून आपला देश व आपले राज्य या संकटाचा समर्थपणे मुकाबला करत आहे. आरोग्याच्या सुविधा वाढत आहेत, ही समाधानाची बाब असून रुग्णांचा शोध, तपासणी व उपचार या बाबीवर भर देण्यात येत आहे. कोरोना बाधितांवर उपचारासाठी काही ठिकाणी आरोग्य सुविधांची तात्पुरत्या स्वरूपात उभारणी करण्यात आली असून येणाऱ्या काळात या सुविधा कायम स्वरूपी उपलब्ध करून देण्याची सूचनाही त्यांनी यावेळी केली. येणाऱ्या काळात आरोग्य यंत्रणेसह आपणा सर्वांसमोर कोरोनामुळे होणारा मृत्युदर कमी ठेवण्यासाठी सर्वंकष व सामूहिक प्रयत्नांची गरज असल्याचे सांगत या लढ्यात आरोग्य, पोलीस, महसुल यंत्रणा मोठ्या प्रमाणावर लढत असून या सर्वांचे कार्य कौस्तुकास्पद व अभिनंदनीय असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले.

याप्रसंगी राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे म्हणाले की, जालना जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात उभारण्यात आलेल्या बी.एस.एल. 3 या आधुनिक पद्धतीच्या प्रयोगशाळेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणावर कोरोना चाचण्या करून रुग्णांवर योग्य ते उपचार केले जाणार आहेत. आधुनिक व सुसज्ज अशा या प्रयोगशाळेत बुरशी, विषाणु जिवंत राहू शकणार नाही अशा पद्धतीची यंत्रणा बसविण्यात आलेली आहे. कोविड बरोबरच या प्रयोगशाळेत अनुवंशिकते संबंधी, एचआयव्ही, साथीचे आजार यासह अन्य तपासण्या केल्या जातील. या प्रयोगशाळेच्या माध्यमातून आपणास दररोज लवकरात लवकर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचे अहवाल प्राप्त होणार असल्यामुळे त्यांच्या निकट सहवासितांची ओळख होईल व त्यांच्या देखील तपासण्या करून कोरोनाची साखळी तोडण्याबरोबरच कोविड बाधितांवर तातडीने उपचार करणे सोयीचे होणार आहे तसेच प्लाझ्मा थेरपी व अ‍ॅन्टीबॉडी टेस्टिंग मशिन लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या