
जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात असलेल्या राजुरेश्वर क्लिनिकमध्ये अवैधरित्या गर्भपात होत असल्याची माहिती पुणे येथील कुटूंब कल्याण विभागाने जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांना दिली होती. त्यानुसार 30 एप्रिलच्या मध्यरात्री 12.30 वाजता राजुरेश्वर क्लिनिक येथे सापळा लावण्यात आला होता. परंतु ऐन वेळी डॉक्टरने प्रतिसाद न दिल्याने हा सापळा यशस्वी झाला नव्हता.
त्यानंतर आरोग्य विभागाच्या पथकाने थेट क्लिनिक मध्ये जाऊन पाहणी करण्याचा निर्णय घेतला. चंदंजिरा पोलिसांना सोबत घेऊन त्या ठिकाणी छापा मारला असता एका महिलेचा गर्भपात होत असल्याचे समोर आले. त्यानंतर सदरील महिलेला शहरातील गांधी चमन येथील स्त्री रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि राजुरेश्वर क्लिनिक सील करण्यात आले. सदरील महिलेच्या पोटात स्त्री अर्भक आढळून आल्याची माहिती पथकाने दिली.
सदरील क्लिनिक मधून गर्भपात करण्याच्या गोळ्या, रोख रक्कम आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. तेथील बनावट डॉ. एस. बी. गवारे हा मात्र सकाळपासूनच बाहेर असल्याने तो पथकाच्या हाती लागला नाही. मात्र तिथे काम करणार्या कंपाउंडरला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
30 एप्रिलच्या रात्री साडेबारा वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या फिर्यादीनुसार चंदनझिरा पोलीस ठाण्यात सदरील डॉ. सतीश बाळासाहेब गवारे, संदीप गोरे, डॉ. पूजा गोविंद गवारे, डॉ. प्रीती मोरे आणि मेडिकल मालक स्वाती गणेश पाटेकर आणि त्यांना सहाय्य करणाऱ्या अन्य व्यक्ती विरोधात भादवि कलम 312, 313, 315, 120 ब, आणि पीसीपीएनडीटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चंदनझिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नाचण हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत. तर पोलीस उपनिरीक्षक गणेश झलवार यांनी आरोग्य विभागाच्या पथकासह क्लिनिकवर छापा मारून एकास ताब्यात घेतले आहे.
बनावट डॉ. एस. बी. गवारे याने अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात अवैध गर्भपात केल्याची शक्यता वर्तवली जात असल्याने पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. विजय वाकोडे, डॉ.सरोज घोलप, सोनाली कांबळे, मनोज जाधव यांच्यासह चंदनझिरा पोलिसांनी ही कारवाई केली.
गर्भपात करण्याचे साहित्य जप्त
तेथे उपस्थित असलेले राजु भानुदास पवार डॉक्टरांचा मदतनीस व दोन महिला मदतनीस त्यांच्या म्हणण्यानुसार डॉक्टर सोनोग्राफीसाठी वेळ देऊन गर्भ लिंग निदान करतात व स्त्री जातीचे गर्भ असल्यास गर्भपात देखील करुन देतात. सदरील 15 हजार ते 20 हजार रुपये घेतात व गर्भपात करण्यासाठी 18 ते 20 हजार रुपये घेतात. राजुरेश्वर क्लिनीक व तेथे उपस्थित डॉक्टर यांचे मदतनीस व महिला मदतनीस यांची झडती घेतली असता त्यांनी लपवुन ठेवलेल्या गर्भपाताचे 03 MTP किट, 01 वापरण्यात आलेली MTP किट आढळुन आली. तसेच जप्त केलेले वस्तुमध्ये ब-याच डॉक्टरांचे रेफर बुक, रजीस्टर, MTP किट, नकदी रुपये, रुग्णाला लावण्यात आलेली सलाईन हे सर्व साहित्य जप्त करुन व सिल बंद करुन पोलीस यांचे ताब्यात देण्यात आले.
नोंदणीकृत नसलेल्या डॉक्टरकडुन व गर्भपाताची नोंदणी नसलेल्या क्लिनीकमध्ये गर्भपात करतांना आढळून आल्याने वैद्यकीय गर्भपात कायद्यानुसार कलम 312, 313, 315, 120 (ब), 201, 34 भा.द.वि. सह कलम 3 व 4 वैद्यकिय गर्भपात कायदा 1971 सह कलम 33 महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर अॅक्ट, सह कलम 3 व 6 गर्भधारणा पूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्रलिंग निवडीस प्रतिबंध कायदा 1994 प्रमाणे संदीप राजु भानुदास पवार व महिला नामे सुनिता सुभाष ससाणे व कौशल्या नारायण मगरे, तसेच पळून गेलेले डॉ. सतीष बाळासाहेब गवारे, एजंट संदीप गोरे, डॉ. पूजा विनोद गवारे, गर्भपातासाठी पेशंट घेऊन येणारे डॉ. प्रिती मोरे रा. रामनगर (साखर कारखाना) व गर्भपात करण्यासाठी लागणारे औषधी पुरवणारे मेडीकल मालक स्वाती गणेश पाटेकर यांच्याविरुध्द कायदेशीर फिर्याद देऊन पोलीस ठाणे चंदनझिरा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

























































