जालन्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर चार लाखांचा दारुसाठा जप्त

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर परजिल्ह्यात अवैधरित्या देशी दारु विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या विरुध्द कारवाई करुन 4 लाख 7 हजार रुपये किंमतीचा दारुचा साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने काल रात्री जालना शहरातील लक्कडकोट भागात केली आहे.

जालना शहरात स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करीत असतांना त्यांना खबऱ्या मार्फत माहिती मिळाली. जालना शहरातील लक्कडकोट परिसरातील देशी दारु दुकान मालक, चालक हा स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी त्याचे शासन मान्य किरकोळ देशी दारु दुकानामधून काही देशी दारुचे सिलबंद बॉक्स एका चॉकलेटी रंगाचे इंडिगो कार वाहनामध्ये टाकून ते ग्रामपंचायत निवडणुक काळात काळ्या बाजारात जास्त किंमतीत विक्री करण्यासाठी त्याचे लोकाचे मार्फत बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजाकडे घेऊन जात आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी 12 जानेवारी रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास लक्कडकोट परिसरात देशीदारु दुकानातून येणारे आरोपी रामेश्वर दत्ता पवार, अनिकेत परमेश्वर जाधव (दोघे रा. सिव्हील कॉलनी व त्र्यंबकनगर, देऊळगावराजा) हे घेऊन येणारे चॉकलेटी रंगाचे इंडिगो कार क्र. (एमएच-28, व्ही- 2884) मध्ये देशी दारु सखु संत्राचे सिलबंद 15 बॉक्स एकुण 720 बाटल्या किंमती 57 हजार 600 रुपयांचा माल व अवैध दारु वाहतुक करण्यासाठी वापरलेली कार किंमत 3 लाख 50 हजार रुपये असा एकुण 4 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

सदर प्रकरणात देशी दारु किरकोळ विक्री दुकानदार चालक/मालक सतिष उर्फ लाला प्रकाशजैस्वाल, रामेश्वर दत्ता पवार, अनिकेत परमेश्वर जाधव यांच्या विरुध्द सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधिक्षक विनायक देशमुख, अपर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे, कृष्णा तंगे, प्रशांत लोखंडे यांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या