
दागिन्यांसाठी नातवांनीच आजीची हत्या केल्याची खळबळजनक घटना जालन्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही नातवांना बेड्या ठोकल्या आहेत. केशराबाई गंगाधर ढाकणे(65) असे मयत महिलेचे नाव आहे. सदर गुन्ह्याचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आहिरे आणि त्यांचे सहकारी करीत आहेत.
जालन्यातील भोकरदन तालुक्यातील हसनाबाद पोलीस ठाणे अंतर्गत चांदई एक्को या गावात 29 एप्रिल रोजी ही घटना उघडकीस आली. सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास चांदई एक्को शेत शिवारात घरासमोर केशराबाई मृतावस्थेत आढळल्या. त्यांच्या कानातून आणि नाकातून रक्त येत होते. महिलेचे कान तुटलेले होते. महिलेच्या अंगावरील दागिने गायब होते.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून महिलेची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी केशराबाई यांचा मुलगा राजू ढाकणे यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी तपास सुरू केला असता महिलेचा सख्खा आणि चुलत दोघे नातू हत्येवेळी घटनास्थळी होते. त्यानंतर ते फरार झाल्याचे समजले. आजीच्या अंतसंस्काराला नातू हजर राहिले नसल्याने पोलिसांचा त्यांच्यावरील संशय बळावला.
पोलिसांनी दोघा नातवांचा कसून शोध घेत त्यांना मध्य प्रदेश बॉर्डरवरून ताब्यात घेतले. त्यांच्याकडील दागिने ताब्यात घेत त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यानंतप दोघांविरोधात गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आली.