लखमापूरीत दरोडेखोरांचा हैदोस,धाडसी दरोड्याचा प्रयत्न फसला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। सुखापुरी

जालना जिल्ह्यातील व अंबड तालुक्यातील लखमापूरी येथे दरोडेखोरांनी हैदोस घातला असून धाडसी दरोड्याचा प्रयत्न फसला आहे. येथे राहणाऱ्या अशोक गंगाधर तांदळे यांच्या घरी शनिवारी चोरट्याने गेट उघडून प्रवेश केला खरा. पण चॅनलगेटला लावलेले कुलुप टॉमीच्या साहाय्याने तोडण्याचा प्रयत्न फसला. यामुळे चोरट्याने व्हरांड्यातच लावलेली हिरोहोंडा कंपनीची पॅशन- प्रो( एमएच-२१-ए-ई२६२१) काळ्या रंगाची मोटर सायकल पळविली.

टॉमीच्या सहाय्याने गेट उघडले नसल्याने मोठ्या दरोड्याचा प्रयत्न फसला. तसेच त्याच रात्री रुस्तुमराव भापकर यांच्या घरामधील पेटीत ठेवलेले रोख१५ हजार रुपये चोरट्यांनी पळविले. तसेच घराची झाडाझडती घेतली. मात्र काही आढळून आले नसल्याने घरात नासधूस केली. पुन्हा जवळच असलेल्या पाराजी पिसुळे हे घरात झोपले असता त्यांच्या घरी चोरट्याने झाडाझडती घेऊन घरगुती वापरातील वस्तू चोरुन नेल्या. तसेच पायातील चांदीचे जोडवे व ५ साड्या पळविल्या. समर्थ सहकारी साखर कारखाना अंकुशनगर ऊस तोडणीसाठी आलेल्या टोळीला देखील याच रात्री चोरट्याने लुटले. टोळी मुकादम रमेश बदु जाधव यांचे नगदी रोख २० हजार रुपये व ओप्पोचा मोबाईल फोन चोरला.तसेच विनायक फुलचंद जाधव यांच्या झोपडीतून २० हजार रुपये रोख चोरले त्यांनी आठवडी बाजारात गाय विक्री केली होती व हे रुपये मुलांच्या शिक्षणासाठी बीड येथे पैसे पाठवायचे असल्याचे सांगितले. तसेच त्याच टोळीतील लक्ष्मण नीला जाधव यांच्या झोपडीतून ७ हजार रुपये रोख जे की वाढे विक्रीतुन जमा केले होते ते देखील अज्ञात चोरट्याने पळविले.विठ्ठल रायसल राठोड याचे देखील १० हजार रुपये त्याच अज्ञात चोरट्याने पळविले.

चोरी झाल्याची माहिती गोंदी पोलिसांना कळताच गोंदी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एच.व्ही.वारे, पोलीस कॉन्स्टेबल एन.एच. चव्हाण,अमर पोहार, ज्ञानेश्वर मराडे,योगेश दाभाडे घटनास्थळी येऊन पंचनामा केला.लखमापूरी गावात वाढत्या चोऱ्या होत असल्याने गावांत ग्रामसुरक्षा दलाची स्थापना होणे गरजेचे आहे. तसेच रात्रीच्या वेळी गावात पोलिसांची देखील गस्त वाढविण्यात येऊन ताबडतोब चोरीचा तपास लावण्यात येईल, असे पोलीस उपनिरीक्षक एच.व्ही.वारे यांनी सांगितले.