
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जालन्यात कडक लॉकडाऊन असताना तीन दरोडेखोर दुचाकीने गिऱ्हाईक बनून जालना शहरातील संभाजीनगर भागातील मनीषनगर परीसरात आले. दुकान बंद असताना सामान घ्यायचे म्हणून दुकान उघडायला लावून तिघांनी दुकानाचे मालक साबरमल झाला यांना पिस्तुलाने डोक्यात मारून त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी आणि 20 ते 22 हजार रूपयांची रोकड मिळून एकुण 25 हजाराचा ऐवज लुटून नेल्याची घटना आज रविवारी 9 मे रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येवून परीसरात शोध घेतला, परंतू तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते.
जालना शहरातील मनीषनगर भागात साबरमल झाला (52) यांची पारस हार्डवेअर हे दुकान बंद आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने दुकान बंद होते. त्यामुळे व्यापारी झाला हे बाहेर बसलेले होते. दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या तिघा दरोडेखोरांनी काही सामान खरेदी करावयाचे असल्याचे सांगून त्यांना विनंती करून दुकान उघडावयास लावले. दुकानात गेल्यानंतर तिघांनी झाला हे सामान काढीत असताना त्यांच्या गळ्याला चाकू लावत पिस्तुलचा धाक दाखवित त्यांच्या हातातील सोन्याची अंगठी व गळ्यातील चैन काढून घेतली. त्यानंतर गल्ल्यातील 20 ते 22 हजाराची रोकड आणि अंगठी, चेन मिळून एकुण 25 हजाराचा ऐवज लुटला. जाता जाता त्यांनी झाला यांच्याकडे सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली, परंतु त्यांनी फुटेज देण्यास नकार देताच त्यांच्यावर चाकूने वार करण्यात आला. यावेळी दरोडेखोरांजवळील पिस्तुल व चाकु जागेवर सोडून पसार झाले.
झाला यांनी वार चुकविल्याने त्यांच्या हातावर चाकू लागला. त्यानंतर पिस्तुलाने त्यांच्या डोक्यावर मारून जखमी केले. घटनेची माहिती पोलिसांना मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर खिरडकर, सदर बाजाचे पोनि. संजय देशमुख, चंदनझिऱ्याचे पोनि. यशवंत जाधव, उपनिरीक्षक रमेश रूपेकर, गणेश झलवार, पोहेकॉ. समाधान तेलंग्रे आदींनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी श्वानपथकासह ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते.
सीसीटीव्ही फुटेज तपासले
घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता एका दुचाकीवर बसून तिघे जातांना दिसत आहे. विशेष म्हणजे भरदिवसा घटना घडल्यावरही व्यापाऱ्यांना लुटल्याची घटना घडल्याने परीसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.



























































