जालना – समृध्दी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांच्या शेडमध्ये ट्रक घुसला, दोन मजूर ठार

नागपूर-मुंबई हा समृद्धी महामार्ग जालना जिल्ह्यातून जात असून समृद्धी महामार्गाचे काम करण्यासाठी परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आले आहेत. जालना तालुक्यातील निधोना गावाजवळ दोन्ही रस्त्याच्या मध्यभागी हे मजूर राहतात. आज 7 मार्च रोजी पहाटे साडेचार वाजताच्या सुमारास हायवा ट्रक त्यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसल्याने दोघा कामगारांचा मृत्यू झाला. धनीकराम छकु भुमिया व मुकेश गोरीलाल भुमिया दोघे (रा. बंजर बरेला, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश) असे मयतांचे नावे आहेत.

जालना तालुक्यातील निधोना गावाजवळ समृद्धी महामार्गावरून जाणाऱ्या पुलाचे काम चालू आहे. इथे काम करणाऱ्या कामगारांनी दोन्ही रस्त्यांच्या मध्ये असलेल्या मोकळ्या जागेत पत्रे ठोकून तात्पूरता निवारा केला होता. दिवसभराचे काम आटोपून रात्रीच्या सुमारास या पत्र्यांच्या निवाऱ्यामध्ये आठ कामगार झोपले होते. पहाटे साडेचारच्या सुमारास एक रिकामा हायवा ट्रक भरधाव वेगात आला आणि सरळ या शेडमध्ये घुसला. यात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसऱ्याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू पावला. यात दोन-तिघे जखमीही झाले आहेत. या अपघात प्रकरणी राजकुमार छकु भुमिया (रा. बंजर बरेला, जिल्हा कटनी, मध्य प्रदेश) याने चंदनजिरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या