
ट्रकमधील पॉवर स्टेशनच्या लोखंडी साहित्याला रस्त्यावरून क्रॉस गेलेल्या मेन विद्युत लाईनची तार अडकून तुटल्याने शॉक लागून ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी अकरा वाजेच्या सुमारास जालना-अंबड रस्त्यावर आंतरवाला शिवारात ही घटना घडली. मनोहर निकाळजे असं ट्रक चालकाचं नाव असून तो संभाजीनगर येथील रहिवाशी असल्याची माहिती समोर आली आहे.
सकाळी अकरा वाजेच्या सुमारास संभाजीनगरहुन अंबडकडे महावितरण कंपनीचे साहित्य घेऊन ट्रक जात असताना या ट्रकमधील पॉवर स्टेशनच्या साहित्याला रोडवरून क्रॉस गेलेली मेन लाईनची विद्युत तार गुंतून तुटली.यानंतर ट्रकमधून खाली उतरलेल्या ट्रकचालकाला या मेन लाईनचा शॉक लागून त्याचा रस्त्यावरच मृत्यू झाला.अचानक झालेल्या घटनेने गाडीचा क्लिनर मोह,सिराज हा सुध्दा घाईगडबडीत खाली उतरला,परंतु त्याच्या पाया मध्ये चप्पल असल्याने तो विद्युत तारे पासून बचावला.
दरम्यान रोडवर विद्युत तार उघडी पडली असताना अंबड हून महामंडळाची एस टी बस येत होती. परंतु पोलिसांनी वेळीच प्रसंगावधान दाखवून एसटी बसला थांबवले व पुढील अनर्थ टळला. या घटनेची माहिती मिळताच महावितरण कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतुक काही वेळ विस्कळीत झाली होती. हायवे पोलिस व जिल्हा वाहतूक शाखेच्या कर्मचारी सुर्यकांत चाटे, आशोक येडके, आनंद कनाटे, यांनी वाहतूक सुरळीत केली. तालुका पोलिस ठाण्याच्या पोलिसांनी मयतास उत्तरीय तपासणीसाठी सामान्य रुग्णालय जालना येथे हलविले आहे.


























































